PM मोदींच्या सभेपूर्वी आंदोलकांना प्रतिबंधात्मक नोटीसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी (दि. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा पिंपळगाव बसवंत येथे होत आहे. सध्या जिल्ह्यात कांदाप्रश्नी शेतकरी व काही संघटना आक्रमक असल्याने सभास्थळी त्यांच्याकडून निषेध व्यक्त होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर-जिल्हा पोलिसांकडून संबंधितांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजाविण्यात येणार असून, काहींना खबरदारी म्हणून सभा संपेपर्यंत नजरकैदेत ठेवण्याची शक्यता आहे. तसेच, सभास्थळी येणाऱ्यांवर करडी नजर राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सभेत प्रवेश नाकारला जाणार आहे.

लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघांत येत्या सोमवारी (दि.२०) मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. या सभेच्या बंदोबस्ताचे नियोजन सुरू असून, शहर व ग्रामीण पोलिस सतर्क झाले आहेत.

काय घेणार खबरदारी ?

  • सभास्थळाचा बंदोबस्त, वाहतूक नियोजन, वाहनतळासह सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर पोलिसांची करडी नजर राहील
  • सभेत काळे कपडे घालणाऱ्यांसह कांदा घेऊन येणाऱ्यांवर विशेष नजर राहील, असे सूत्रांनी सांगितले.
  • तसेच सभास्थळी कोणी निषेध करू नये यासाठीही पोलिस खबरदारी घेत आहेत.
  • कांदाप्रश्नी आंदोलन किंवा निषेध करणाऱ्यांची शक्यता असणाऱ्यांना नोटीस बजावण्यासह प्रतिबंधात्मक कारवाई केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिस सतर्क

पंतप्रधान मोदी यांच्या सभेमुळे मुंबई-आग्रा महामार्गासह जिल्ह्यातील हॉटेल्स, ढाबे, लॉजेसची नियमित तपासणी केली जात आहे. त्यात निवासी राहणाऱ्यांचीही चौकशी होत आहे. जिल्ह्यातील रेल्वेस्थानक, बसस्थानकांवर पोलिसांनी २४ तास नजर ठेवली आहे. पंतप्रधानांच्या मार्गावर श्वानपथक, बॉम्बशोधक-नाशक पथकामार्फतही नियमित तपासणी हाेत आहे. स्थानिक पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखा, गोपनीय शाखा, दहशतवादविरोधी कक्ष, राज्य गुप्तवार्ता, राज्य गुन्हे अन्वेषण यासह सर्व विभागांचा बंदोबस्त तैनात असेल. सुरक्षेच्या कारणास्तव काही अटी-शर्ती व निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –