पेठ, जि. नाशिक : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उंबरपाडा (सुरगाणे ) अंतर्गत येत असलेल्या चिखली या गावात गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावाच्या बाजूला ग्रामपंचायतीच्या दोन विहिरी आहेत. मात्र, त्या कोरड्या ठाक पडल्या आहेत. त्यातील एका विहिरीतील झऱ्यात २० मिनिटांनंतर हंडाभर पाण्यासाठी जमा हाेत असल्याने रात्र जागून बॅटरीच्या प्रकाशात हंडाभर पाणी भरले जात आहे.
चिखली गावाची लोकसंख्या सुमारे २५० इतकी आहे. गावाच्या बाजूला ग्रामपंचायतीच्या दोन विहिरी असल्यातरी त्या मार्च महिन्यापासून कोरड्या ठाक पडल्या आहेत. एका विहिरीत छोटासा झरा असून त्या झर्यात १५- २० मिनिटांनंतर एक हंडाभर पाणी जमा होते. त्यामुळे हे हंडाभर पाणी घेण्यासाठी येथील रहिवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्री बॅटरीच्या उजेडा पाणी घेण्यासाठी थांबावे लागत आहे. तसेच नदीत खोदलेल्या झिर्यातून दगडगोट्यातून वाट काढत जीव धोक्यात घालून पाण्याची आणावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आमच्या गावात मार्च महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी आम्हाला रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने आम्हाला पाणी उपलब्ध करून द्यावे. – आंबीबाई भवर, स्थानिक महिला
आम्हाला पिण्याचे पाणीच नसल्यामुळे विहिरीवर रात्री- बेरात्री बॅटरीच्या प्रकाशात एक-एक हंडा पाणी भरावे लागते. त्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. – यमुना हाडळ, स्थानिक रहिवासी
हेही वाचा: