अंजनेरी गडावर हनुमान जन्मोत्सव, लाखो भक्तांची दर्शनासाठी गर्दी

अंजनेरीगड नाशिक

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- हनुमान जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गड येथे हनुमान जयंतीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हनुमानाच्या जयघोषात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

दर्शनासाठी भाविकांनी सोमवारी रात्रीपासूनच गडावर येण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी दिवसभर भक्तांचा ओघ सुरूच होता. दरवर्षाप्रमाणे यंदाही दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. सकाळी महाआरती व महापूजेसाठी अंजनीमाता मंदिरात सरपंच जिजाबाई लांडे, उपसरपंच अनिता चव्हाण, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडित चव्हाण, राजराम चव्हाण, भाऊसाहेब लांडे, पोलिसपाटील संजय चव्हाण यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. अंजनेरी ग्रामपंचायतीने भाविकांच्या सुविधेसाठी स्वयंसेवक नेमले होते. वन खाते, पोलिस प्रशासन यांनी कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, यासाठी दोन दिवसांपासून तळ ठोकला होता. पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे, रूपेश मुळाणे यासह कर्मचारी स्वत: गडावरील अंजनीमाता मंदिरात आरतीसाठी उपस्थित होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रोत्सव निर्विघ्न संपन्न झाला. पोलिस प्रशासन, वन खाते, तहसील कार्यालयाचे यात्रोत्सव समितीनो आभार मानले.

दहाच्या महाआरतीला विरोध

अंजनेरी ग्रामपंचायत आणि काही ग्रामस्थांनी बाहेरून आलेल्या आणि हनुमान जन्म संस्थान नाव असलेल्या भाविकांना सकाळी दहा वाजता महाआरती करण्यास विरोध केला. मंदिर संस्थानची महाआरती परंपरेने सकाळी 5 वाजता होत असते. त्यानंतर केवळ सोशल मीडियातील प्रसिद्धीसाठी आरती करण्यास आमचा विरोध असल्याचो पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला. त्यामुळे दहाची महाआरती झाली नाही. याबाबतची माहिती अंजनेरी वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडित चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा –