नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार (दि. २६) पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. उमेदवारी अर्जासाठी ३ मे अंतिम मुदत असून, शासकीय सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत अर्ज दाखल करता येईल. उमेदवार व राजकीय पक्षांनी अर्ज भरताना आयोगाच्या सूचनांचे पालन करताना वेळेचे भान राखावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. २६) राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, निवडणूक शाखेचे तहसीलदार श्याम वाडकर यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी २६ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. निवडणुकीत अर्ज दाखल करताना उमेदवाराने शपथपत्रामध्ये मालमत्ता व कर्जाची सविस्तर माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. तसेच शैक्षणिक अर्हततेसोबत त्यांचे सोशल मीडियावरील अकाउंटची माहिती भरणे आवश्यक आहे. सोबतच निवडणूक खर्चाच्या स्वतंत्र बँक खात्याचा तपशील देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला २५ हजार रुपये अनामत रक्कम नामनिर्देशन अर्जासोबत भरावी लागेल. अनुसूचित जातीचा किंवा जमातीचा उमेदवारासाठी १२,५०० रुपये अनामत रक्कम असून, त्यासोबत जात प्रमाणपत्र सादर करावे. नामनिर्देशन पत्र व शपथपत्रातील सर्व रकाने भरावे आदी सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या. यावेळी स्ट्राँगरूम परिसरात मोबाइल व नेटवर्क जॅमर बसविण्याची मागणी प्रतिनिधींनी केली.
बैठकीत सूचनांचा पाऊस
बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधींनी सूचना केल्या. प्रमुख प्रचार संपुष्टात आल्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी गुजरात व मध्य प्रदेशातील लोक नाशिकमध्ये येऊन मतदारांना आमिष दाखवित असल्याची तक्रार प्रतिनिधीने केली. मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांच्या मतदान बूथवर उमेदवाराचे छायाचित्र असलेले बॅनर लावू द्यावे. टेंडर व चॅलेंज मतदानाबद्दल केंद्राधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. काही भागांत मृत व दुबार नावे यादीत कायम असून, ती तातडीने वगळावी आदी सूचना करण्यात आल्या. प्रशासनाकडून या सर्वांची दखल घेण्यात आली.
हेही वाचा: