त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील हरसूल पोलिस ठाणे हद्दीत जमिनीच्या वादातून हाणामारी करणे संबंधितांच्या चांगलेच अंगलट आले आहे. याबाबत तीन गुन्हे दाखल झाले असून, त्यातील १५ संशयित आरोपींना १७ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
बेहेडपाडा येथील मनोहर किसन पवार (५२) यांनी रेखा रामजी पवार यांच्याकडून त्यांच्या माहेरकडील जमीन दोन वर्षांपूर्वी विकत घेतलेली आहे. या व्यवहारावरून महिलेचे माहेरकडील नातेवाईक सुभाष सावळीराम पवार, मारुती महादू पवार व इतरांमध्ये वादाला ताेंड फुटले. त्यांनी रेखा यांना दमबाजी केली. त्याबाबत गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, शनिवारी (दि.४) पांडू काशिराम पवार आणि निवृत्ती मनोहर पवार यांच्या गटातही वाद होऊन हाणामारी झाली. दोन्ही गट आक्रमक झाल्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी मनोहर किसन पवार (५२), भगवान मनोहर पवार (३०), दशरथ मनोहर पवार (२५), निवृत्ती मनोहर पवार (२८), मारुती महादू पवार (३४), सुभाष सावळीराम पवार (३९), सोमनाथ मधुकर पवार (२९), दीपक पांडू पवार (२५), केशव कृष्णा पवार (२३), बाळू देवरथ पवार (३२), नरेंद्र कृष्णा पवार (२९), माधव दामू महाले (२५), उमाजी देवरथ पवार (३१), मधुकर ढवळू पवार (५५), महादू कृष्णा पवार (२६) सर्व रा. बेहेडपाडा यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सर्व आरोपींना मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलिसांचा इशारा
सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने या कालावधीत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. शांततेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा हरसूल पोलिसांनी दिला आहे.
हेही वाचा –