नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
भोंदूबाबाला बसण्यासाठी बिबट्याच्या कातडीची गादी विकणारी टोळी इगतपुरी तालुक्यात जेरबंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांना पिंपळगाव मोर शिवारातील मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी काही संशयित बिबट्याची कातडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बुधवारी (दि.१३) सकाळी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यात नामदेव दामू पिंगळे (३०, रा. पिंपळगाव मोर, ता. इगतपुरी), संतोष सोमा जाखेरे (४०, पोलीस रा. मोगरे, ता. इगतपुरी), रवींद्र मंगळू आघाण (२७, रा. खैरगाव, ता. इगतपुरी), बहिरू उर्फ भाऊसाहेब चिमा वेंडकोळी (५०, रा. पिंपळगाव मोर, ता. इगतपुरी), बाळू भगवान धोंडगे (३०, रा. धोंडगेवाडी, ता. इगतपुरी) यांचा समावेश आहे. त्यांच्या कब्जातील गोणपाटातून विवट्याची कातडी व एक लोखंडी कोयता जप्त केला आहे.
जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय नाशिक यांच्याकडून परीक्षण करून घेण्यात आली. झातपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांचे पथक पुढील तपास करीत आहेत. संन्यासी दिलीप बाबा याचा पोलिस पथक शोध घेत आहेत. पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, पोलिस उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार संदीप नागपुरे, चेतन संवत्सरकर, मेघराज जाधव, हेमंत गरूड, पोलिस नाईक विनोद टिळे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, मनोज सानप यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
असा रचला बिबट्याला ठार करण्याचा कट
संशयित आरोपी संतोष जाखेरे याचा साथीदार संन्यासी दिलीपबावा यास बावागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी पाहिजे होती. त्यासाठी संशयित नामदेव पिंगळे हा गुरे चारण्यासाठी मोराचे डोंगरावर जात असे. या ठिकाणी वन्यप्राण्यांचे पाणी पिण्याचे डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या क्लजवायरचा गळफास लावला. पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याला पकडून त्याने ठार मारले. यानंतर संशयितांनी बिबट्याची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुकवली. कातडी ही संन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी जात होती, असे पोलिस तपासात समोर आले.
The post इगतपुरी : बिबट्याच्या कातडीची गादी बनविणाऱ्यांना अटक appeared first on पुढारी.