नाशिक (राजापूर) : पुढारी वृत्तसेवा
दुष्काळ अनुदान मिळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची केवायसी अद्यापही झालेले नाही. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे केवायसीला प्रलंब होत आहे. पोर्टल आज-उद्या चालू होईल, असे करता-करता शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
यंदा खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभी कोवळी पिके जळून खाक झाली आहेत. एक रुपयाचे उत्पन्नही हाती लागले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी भयंकर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पाहता ऑक्टोबर २०२३ मध्ये राज्यात ४० तालुक्यांत मध्यम आणि उच्च स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ८५०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. यासाठी शासनाने केवायसीच्या याद्या ४० तालुक्यांत पाठवल्या आहेत. सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतली आहे. अशाच शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाचे पैसे वाटपदेखील झाले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही. प्रमाणीकरण ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे दुष्काळाच्या गाभाऱ्यात सापडलेला आहे. केवायसीसाठी रात्रं-दिवस सीएससी केंद्रावर जाऊन पहारा करण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. एक तर शासनाने पोर्टलला येत असलेली तांत्रिक अडचण लवकर दूर करावी, अन्यथा अनुदानाची रक्कम सरसकट खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आधीच दुष्काळी, अवकाळी, परिस्थितीमुळे कोलमडलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाची प्रक्रिया सुलभ करून द्यावी. जेणेकरून अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
हेही वाचा:
- Weather Update : राज्यात दोन-तीन दिवस अवकाळी
- Monsoon Report : यंदा मोसमी पाऊस वेळेआधी; हवामानशास्त्रज्ञांचा मान्सूनबाबत आशादायी अंदाज
- Stock Market | मार्केटमध्ये तेजी येऊ शकते, पण गुंतवणूक सावधपणे करा
The post ई-केवायसीअभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले appeared first on पुढारी.