नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का अन्…’ हे वाक्य कानी पडले की, निवडणुका आल्याची माहिती खेडोपाडी व्हायची. सोशल मीडियाच्या युगात निवडणुकांची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर होत असली तरी, प्रचाराचे हे माध्यम अजूनही प्रभावी ठरत आहे. होय, २० मे रोजी होऊ घातलेल्या नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतील प्रचाराची रंगत वाढली असून, उमेदवाराकडून रिक्षा, टमटमवर अशा प्रकारे प्रचार करण्यावर भर दिला जात आहे.
सोशल मीडियाच्या युगात एका क्लिकवर हजारो, लाखो मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारास शक्य आहे. मात्र, जोपर्यंत उमेदवाराचे नाव आणि चिन्ह मतदारांच्या कानी पडत नाही, तोपर्यंत मतदारांच्या मनात घर करणे अशक्य असल्याची उमेदवारांची धारणा असल्याने, त्यांच्याकडून पारंपरिक प्रचार माध्यमांवर भर दिला जात आहे. सध्या शहरासह ग्रामीण भागात अशा प्रकारच्या प्रचाराचे वाहने फिरत आहेत. रिक्षा, टमटम तसेच जीपवर भोंगा लावून त्यात रेकॉर्डेड कॅसेट चालविली जात आहे. काही ठिकाणी प्रचारासाठी कार्यकर्ते नेमले असून, तेच नागरिकांना ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का अन्…’ अशा प्रकारचे आव्हान करताना दिसून येत आहेत. सध्या या रिक्षा आणि टमटम गावाेगावी तसेच नगरांमध्ये मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. नागरिक विशेषत: ज्येष्ठ अशा प्रकारच्या प्रचाराकडे आकर्षित होत असून, त्यांच्याकडून आवर्जून प्रचाराच्या वाहनाजवळ येऊन उमेदवाराची विचारपूस केली जात आहे. काही ठिकाणी मतदारांकडून उमेदवारांचे उणेदुणेदेखील काढले जात आहेत.
एकंदरीत अंतिम टप्प्यात नाशिकचे मतदान असल्याने, पुढच्या काही दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात प्रचाराचा धुराळा उडवून दिला जाणार आहे. तत्पूर्वी रिक्षा आणि टमटमच्या माध्यमातून केला जाणारा प्रचार मतदारांमध्ये आकर्षण ठरत आहे.
रंगत वाढली
अनेक नाट्यमय घडामोडींनी रंगत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी महाविकास आघाडी तसेच अपक्षांकडून चौक सभा, समर्थकांचे मेळावे, डाेअर टू डाेअर अशी प्रचाराची रूपरेषा आखली होती. मात्र, महायुतीचा उमेदवार जाहीर होताच, प्रचाराच्या पारंपरिक माध्यमांवर सर्वच उमेदवारांनी भर दिल्याचे दिसून येत आहे. सहा विधानसभा मतदा संघ असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात कमीत कमी काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या माध्यमातून उमेदवारांकडून केला जात असल्याने प्रचाराची रंगत वाढली आहे.