उमेदवारीच्या संदर्भात फोन खणाणला अन् पाटलांनी निर्णय थांबवला

माजी महापौर दशरथ पाटील www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुंबईतून आलेल्या एका फोनमुळे गुरूवारी (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय २४ तासांकरीता स्थगित केला आहे. शुक्रवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजता पुन्हा ‘त्या’ व्यक्तीचा फोन येणार असल्याने त्यानंतर पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. अर्थात हा फोन शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आला, शिंदे गटाकडून की भाजपकडून हे मात्र पाटील यांनी जाहीर केलेले नाही.

पाटील यांनी २००४ मध्ये शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. अवघ्या काही हजार मतांच्या फरकाने त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. यंदाही ते नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्याची मनिषा त्यांनी बोलून दाखविली होती. महायुतीचा पर्यायही आपल्यासमोर खुला असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीनेही उमेदवारी जाहीर करताना पाटील यांचा विचार केला नाही. त्यामुळे पाटील यांनी निवडणूक लढविण्यासंदर्भात गुरूवारी (दि.२) भूमिका जाहीर करणार असल्याचे कळविले होते. गुरूवारी पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत निर्णय २४ तासांसाठी लांबणीवर टाकल्याचे सांगितले. आपल्याला कसारा घाटाच्या पुढे असलेल्या एका राजकीय व्यक्तीचा फोन आला. ‘शुक्रवारी (दि.३) सकाळी ११ वाजेपर्यंत थांबा. असा संदेश मिळाल्याने निवडणूक लढविण्याबाबत ते आज भूमिका जाहीर करणार आहेत.

कॉल करणारी व्यक्ती जुन्या पक्षाशी संबधित
सकारात्मक निर्णय कळविला जाईल. त्यानंतर भूमिका स्पष्ट करा’, असे या व्यक्तीने सूचित केले असल्यामुळे आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय २४ तासांकरीता स्थगित केल्याचे पाटील म्हणाले. फोन करणारी व्यक्ती जुन्या राजकीय पक्षाशी संबधित होती, असे त्यांनी सांगितले. परंतू सदर फोन ठाकरे गट, शिंदे गट की भाजपकडून आला हे मात्र त्यांनी जाहीर केले नाही.

हेही वाचा: