ऊन, सलग सुट्यांमुळे मतदानाचा टक्का घसरणार, प्रशासनाला भिती

मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उन्हाचा वाढता तडाखा आणि सलग सुट्यांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्याची भीती जिल्हा प्रशासनाला लागली आहे. भविष्यात विधानसभेच्या निवडणुका घेताना वातावरणाचा आढावा तसेच सलग सुट्यांचा हंगाम टाळून कार्यक्रम घ्यावा, अशी विनंतीवजा सूचना प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला पत्राद्वारे करण्यात आली आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र, काही भागांत उन्हाचा प्रकोप अधिक असल्याने दुपारी चारनंतर नागरिक हे मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. लाेकसभेच्या याच रणसंग्रामात नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. पण जिल्ह्यातील पारा आताच चाळिशी पार पोहोचला आहे. त्यामुळे मे महिन्यात उन्हाचा तडाखा अधिक असण्याची शक्यता आहे. तसेच २० मे रोजी सोमवार असून, त्यापूर्वी शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस सुट्टी लागून आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदानाचा टक्का घसरण्याची चिन्हे नाकारता येत नाही.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला होता. पण, त्यावेळी नाशिक शहरापेक्षा दिंडोरी मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी अधिक होती. त्यावेळी दिंडोरीत ६५.६४ टक्के मतदान नोंदविण्यात आले. त्याचवेळी नाशिक मतदारसंघात अवघे ५९.४० टक्के मतदान झाले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन आग्रही असून, त्यासाठी परिश्रम घेत आहेत. पण उन्हाचा वाढलेला तडाखा तसेच सलगच्या सुट्यांमुळे या प्रयत्नांना खीळ बसू शकते. त्यामुळे यापुढे निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करताना वातावरण व सुट्यांची विचार करून मतदानाची तारीख अंतिम करावी, अशी विनंती प्रशासनाने आयोगाकडे केली आहे.

प्रशासनाकडून संघटनांशी चर्चा

सलग सुट्यांमुळे नागरिकांकडून बाहेरगावी जाण्यासाठी प्लॅनिंग केले जाते. त्यातून खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या माध्यमातून इच्छितस्थळी प्रवासासाठी बुकिंग केले जाते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता ट्रॅव्हल्स कंपन्यांशी संवाद साधत त्यांना बुकिंग करताना प्रवाशांना २० मे रोजीच्या मतदानाची आठवण करून द्यावी, अशी विनंती केली जात आहे. याशिवाय हॉटेल्स‌् असोसिएशनची चर्चा सुरू आहे. मतदान केल्याची निशाणी दाखविल्यानंतर ग्राहकांना बिलात काही सवलत द्यावी, अशी सूचनाही प्रशासनाकडून हॉटेलचालकांना करण्यात येत आहे. तसेच औद्याेगिक संघटना व अन्य घटकांशी संवाद साधताना मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे.

 हेही वाचा –