नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीअंतर्गत जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने त्याच्या स्तरावर जाणीवपूर्वक जनजागृती करावी. कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित करताना तेथे हे प्रमाण वाढविण्याकरिता तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर्सला विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना द्याव्या, असे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीत सोमवारी (दि. २०) नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या अनुषंगाने चोक्कलिंगम् यांनी गुरुवारी (दि. १६) प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
एस. चोक्कलिंगम् म्हणाले, मतदानाच्या दिवशी पाऊस आला, तर पर्यायी नियोजन तयार ठेवावे. मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारींचे निराकरण तत्काळ करताना त्याच ठिकाणी मतदार यादीत नावाच्या समावेशाबाबतचा अर्ज भरून घ्यावा. जेणेकरून विधानसभा निवडणुकीवेळी असे प्रकार रोखले जातील, असे चोक्कलिंगम् यांनी सांगितले. मतदान केंद्रांवर प्रतिबंधित वस्तू जाणार नाहीत, यासाठी दक्ष राहावे. वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवावे अशाही सूचना त्यांनी केल्या. बैठकीपूर्वी चोक्कलिंगम् यांनी अंबडच्या केंद्रीय वखार महामंडळ गोदामास भेट देऊन स्ट्राँगरूम व मतमोजणी तयारीची माहिती जाणून घेतली.
सोशल मीडियावर लक्ष ठेवा
निवडणूक प्रक्रियेवेळी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही यावर विशेष लक्ष ठेवावे. निवडणुकीत पैसा, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील आमिषाचे वाटप तसेच बळाचा वापर होऊ नये यासाठी विशेष लक्ष द्यावे. मतदान काळात सोशल मीडियावर प्रसारीत होणाऱ्या व गैरसमज पसरविणाऱ्या संदेश व इतर घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरित खंडन करणे आवश्यक आहे, अशा सूचना चोक्कलिंगम् यांनी केल्या.
हेही वाचा: