नाशिक : पुढारी वृत्तसेवा=नाशिकमधील कंत्राटदारांवर बुधवारी आयकर विभागाने टाकलेल्या धाडी या निधी संकलनासाठी ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ज्यांच्यावर धाडी पडल्या ते शिंदे गटातील नेत्यांच्या जवळचे कंत्राटदार असल्याची टीका करत आयकर विभागाने संबंधित कंत्राटदारांचा कोणाकोणाशी संबंध आहे? त्यांची गुंतवणूक कोणाकडे आहे, याची सखोल चौकशी करून तथ्य बाहेर आणावे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. (Sanjay Raut On Nashik Income Tax Raid)
नाशिकमध्ये एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या खा. राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिकमध्ये बुधवारी शासकीय कंत्राटदारांवर पडलेल्या आयकराच्या धाडींवर भाष्य करत शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, आयकर विभागाचे धाडसत्र नाशिकलाच का झाले? त्यांचे संबंध कोणाशी? त्यांची गुंतवणूक कुणाकडे आहे? नाशिकमध्ये ललित पाटील, पांढरपेशे पाटील आहेत. याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे स्पष्ट होईलच असे सांगत, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार समोर आले आहेत, कंत्राटदारांसमवेत कोट्यवधींची भागीदारी करणारे आमदार, अधिकारी कोण आहेत ? याची चौकशी झाली पाहिजे, असे राऊत म्हणाले. (Sanjay Raut On Nashik Income Tax Raid)
राहुल नार्वेकर यांच्यासमोर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मात्र, ही सुनावणी फार्स असल्याचा आरोप खा. राऊत यांनी केला. शिवसेनेने या फार्सचा अनुभव घेतला आहे. आता राष्ट्रवादीलाही हा अनुभव येईल. शरद पवार स्वतः हयात असताना तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? हा प्रश्न जर नार्वेकर यांना पडला असेल तर त्यांनी सुनावणी न घेताच निकाल द्यावा, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. हेमंत सोरेन यांच्यावर झालेली कारवाई कितपत कायदेशीर आहे. जे भाजपमध्ये गेले त्यांच्याविरोधात कोणतीच कारवाई होत नाही. त्यांच्यासाठी कायदा कसा बदलतो. ही तर घटनेचीच पायमल्ली असल्याचे राऊत म्हणाले. (Sanjay Raut On Nashik Income Tax Raid)
…तर मनसेनेही महाविकास आघाडीत यावे!
मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबतही राऊत यांनी भाष्य केले. भाजपला लोकशाही संपवायची आहे तर, आम्हाला लोकशाही वाचवायची आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्याचे कर्तव्य सर्वांचेच असून, यासाठी प्रकाश आंबेडकरदेखील आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे जर कुणाला देश वाचविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनीही महाविकास आघाडीत यावे. यासाठी मनसेला स्वतंत्र प्रस्ताव आम्ही का द्यावा, असा सवाल करत देश वाचविण्याच्या प्रक्रियेत सगळ्यांनी सहभागी झाले पाहिजे, तसे त्यांनी पण यावे, असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केले.
मोदी, शहा देशाला अश्मयुगात नेत आहेत
राष्ट्रपती अभिभाषणासाठी काल संसदेत आल्या असताना त्यांच्यापुढे सेंगोल घेऊन एक व्यक्ती चालत असल्याचे दिसले. याबाबत राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ही नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी सुरू आहे. उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान एखाद्या धार्मिक मिरवणुकीतूनही संसदेत येऊ शकतात. देश इराणच्या दिशेने वाटचाल करत आहे. इराणमध्ये अयातुल्ला खोमेनी यांनी राज्य केले. तसे भारतात ही खोमेनीशाही आणून हा देश ५०० वर्षे मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मागच्या ७० वर्षांत ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेले होते. त्या देशाला मोदी, शहा आणि त्यांचे लोक देशाला अश्मयुगात नेण्याच्या विचारात आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
The post कंत्राटदारांवरील आयकर धाडी ब्लॅकमेलिंगचाच प्रकार : संजय राऊत appeared first on पुढारी.