पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा ; उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम संपला नसला तरी बहुतांश शेतकऱ्यांकडील रोप मात्र संपले आहे. खुंटलेल्या रोपामुळे कांदा लागवड अपूर्ण राहिलेले शेतकरी ‘कुणाकडे रोप उरले आहे काय’ याबाबत रानोमाळ हिंडून चौकशी करत आहेत. लागवडीवेळी रोप कमी पडू नये यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने जास्तीचे कांदा बियाणे पेरले होते. परंतु बदललेले वातावरण, अवकाळी पाऊस, अनेक दिवसाचे धुक्याचे वातावरण, बुरशीजन्य व ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव यामुळे अनेक शेतकऱ्यांचे 50 ते 60 टक्के रोप ‘बसून’ गेले. यामुळे प्रत्यक्ष लागवडीवेळी कांदा रोपाची तीव्र टंचाई साक्री तालुक्यातून भासत आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाणी कमी झाल्याने त्यांच्या लागवडीनंतर त्या शेतकऱ्यांकडे कांदा रोप उपलब्ध आहे काय याचा शोध गावोगावी व रानोरान फिरून शेतकरी तपास करत आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कांदा लागवड पूर्ण होण्यासाठी उन्हाळी कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच कांदा रोप तयार करण्यासाठी बियाणे पेरले होते. मात्र वेळोवेळी बिघडणारे हवामान, अवकाळी पाऊस, आठ ते दहा दिवस पसरलेली धुक्याची दाट चादर यामुळे कांदा रोपावर बुरशीजन्य रोग व ‘मर’ रोगाचा ‘व्हायरस’ यांचा हल्ला झाला. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे कांदा रोप वाढीस लागले नाही किंवा खराब झाले. आता खुरटलेल्या रोपावर लागवड पूर्ण करण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र बारीक व खुरट्या रोपामुळे लागवड नेहमीच्या वेगाने करता येत नसल्याने लागवडीसाठी अधिक मजुर लावणे शेतकऱ्यांना भाग पडत आहे. अतिरिक्त मजुरीचा खर्च करूनही बारीक रोपापासून तयार होणारा कांदा मात्र आकाराने लहान असू शकतो व त्यामुळे उत्पादनात जास्त भर पडणार नाही याचीही चिंता शेतकऱ्यांना आहे.
लागवडी विना शिवारात जमीन पडलेली
पुरेसे रोप उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी आधीच तयार करून ठेवलेले क्षेत्र शिवारात लागवडी विना काळेभोर दिसत आहे. शिवारात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील जमिनीचे दोन ते तीन तुकडे रोप नसल्याने ‘पडून’ आहेत. उरलेल्या क्षेत्रात लागवडीसाठी कुठे कांदा रोप मिळते का याचा शोध अजूनही शेतकरी घेत आहेत.
उरलेल्या क्षेत्रात भाजीपाला घेणार
रोप उपलब्ध होत नसल्याने कांदा लागवडीसाठी राखून ठेवलेल्या व तयार केलेल्या क्षेत्रात शेतकरी भाजीपाला पीक घेण्याच्या तयारीत आहेत.परंतु शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र वाढून व एकत्रित उत्पादन जास्त होऊन भाजीपाल्याला योग्य दर मिळणार नसल्याचीही धास्ती वाटत आहे.म्हणून अनेक शेतकरी विलंबाने का होईना गहू,भुईमूग,हरभरा पेरणीच्या पर्यायाचा विचार करत आहेत.
यंदा कांद्याचे रोप खराब झाल्याने लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. वारंवार होणारे हवामानातील बदल, पहाटे पासून तर नऊ-दहा वाजेपर्यंत पसरणारे धुके, अवकाळी पावसाचे वातावरण आणि विविध बुरशीजन्य रोगांमुळे कांद्याच्या रोपावर दुष्परिणाम होऊन ते लागवडीपूर्वीच खराब झाले. म्हणून निर्धारित कांदा लागवड क्षेत्र पूर्ण होऊ शकले नाही. नातेवाईकांकडे आणि तालुक्यातील विविध गावांमध्ये कांदा रोपाबद्दल चौकशी केली.मात्र तेथेही निराशाच पदरी पडली. पूनम बावा,शेतकरी, जिरापूर ता.साक्री
सर्वच शेतकऱ्यांना कांदा रोपाची उणीव भासत असल्याने यावर्षी कांदा लागवडीखालील क्षेत्र 20 ते 25 टक्के घटण्याची शक्यता आहे.उन्हाळी कांदा लागवडीसाठी माझे निर्धारित क्षेत्र 12 एकर लागवड होईल या नियोजनासाठी मी 16-17 एकर कांदे लागवड होईल एवढे बियाणे पेरले होते.मात्र वातावरणाच्या लहरीपणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव झाला व अनेक उपाययोजना करूनही 60 ते 70 टक्के क्षेत्राला पुरेल एवढ्याच रोपांची पूर्तता झाली.माझे स्वतःचे जवळपास चार एकर क्षेत्र लागवडी विना पडून आहे. वंदना देविदास पगारे, शेतकरी
देशशिरवाडे,ता.साक्री
उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागचे निसर्गाचे शुक्लकाष्ठ काही संपत नाही. गेल्या हंगामात कांदा काढणी वेळी अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांचा निम्म्यापेक्षा अधिक कांदा खराब झाला. त्यानंतर शेतातून चांगल्या प्रतीचा शिल्लक राहिलेला कांदा चाळीत साठवणूक करून ठेवला.मात्र त्यातूनही मोठ्या प्रमाणावर कांदा सडून गेला.बाजारपेठेत ‘पडलेल्या’ दरामुळे शेतकरी ठार मेला हे वेगळेच.या हंगामातील लागवडीपूर्वी निसर्गाच्या कोपामुळे कांदा रोप योग्य प्रमाणात व दर्जेदार तयार झाले नाही.त्याचा परिणाम लागवडीखालील क्षेत्रावर निश्चित होणार आहे.यंदा 20 ते 25 टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांना पर्यायी पिकांचा विचार करावा लागत आहे. – मोहित खैरनार,शेतकरी, चिकसे ता.साक्री
हेही वाचा :
The post कुणी रोप देता का रोप? शेतकरी हिंडतोय रानोमाळी appeared first on पुढारी.