गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे? मंत्री भुजबळांचा श्रीकांत शिंदेंना सवाल

छगन भुजबळ www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- तीन दिवसांपुर्वी नाशिकमधील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या लोकसभेसाठी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली. तेव्हापासून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. यावर भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांनी टिका केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही टिकेची झोड उडवली आहे. नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी याबाबतीत जागावाटपाबाबत चर्चा सुरु असताना गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे असा खडा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारला आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या नावाबाबत राज्यभर उत्सुकता लागलेली आहे.

नाशिकला पत्रकारांशी बोलताना मंत्री भुजबळ यांनी अनेक विषयांबाबत चर्चा केली. यामध्ये भाजपकडून हेमंत गोडसेंना विरोध होणे स्वाभाविक आहे. श्रीकांत शिंदेना उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार नसून युतीत सगळ्यांनी थोडीशी शिस्त पाळली पाहिजे, असा सल्ला भुजबळांनी दिला आहे.

महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलताना, मला त्याबाबत माहिती नाही. अजित पवार, प्रफुल्ल पटेल याबाबत अधिक माहीती देतील. आचारसंहिता लागल्यानंतर अडचण होणार आहे. बैठक घेता येतात, पण उमेदवाराला पैसे लावावे लागतात. महायुतीत मनसेला जागा देणार का? याबाबत भुजबळ म्हणाले की, त्याबाबत मी काही अभ्यास केला नाही, मी एवढा ज्ञानी नाही, असे सांगितले.

न्यायालयाची दिशाभूल

सर्वोच्च न्यायालयात पवारांचे वकील संघवी यांनी शरद पवारांचे फोटो दाखवून मत घ्या, असे भुजबळ म्हणाले असल्याचे सांगितले. पण मी असे कधीच बोललेलो नाही. अजित पवार गट झाल्यापासून एकही निवडणूक झाली नाही आणि अजून कुठलाही प्रचार करताना शरद पवारांचा फोटो ग्रामीण भागात दाखवला नाही. एकदम चुकीची माहिती सिंघवी यांना शरद पवार गटाकडून केली जात असून ही न्यायालयाची दिशाभूल केली जात आहे.

हेही वाचा :

The post गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे? मंत्री भुजबळांचा श्रीकांत शिंदेंना सवाल appeared first on पुढारी.