नाशिक रोड : पुढारी वृत्तसेवा- मुंबईतील वसई येथील ज्येष्ठ महिलेकडे घरफोडी करून साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने व चार लाख रुपये घेऊन रेल्वेने पळून जाणाऱ्या तीन चोरट्यांना नाशिक रोड रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी काशी एक्स्प्रेसमधून शिताफीने अटक केली. वेळीच कारवाई करत पोलिसांनी त्यांच्याकडून दागिने व पैसे जप्त केले.
वसईतील आनंदनगरमधील कल्पना नंदकुमार मोरे (वय ६५) संध्याकाळी किराणा आणण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या. परतल्यावर त्यांना घर उघडे दिसले व कपाटातील ३६ आणि १५ ग्रॅमचे मंगळसूत्र, ३५ ग्रॅमचा हार, ४५ ग्रॅमचे पाच जोड रिंग, १५ ग्रॅमची चेन, १०० ग्रॅमचे चांदीचे पैंजण व चार लाखांची रोकड चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी वसई पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांना व नाशिक रोडच्या आरपीएफला या घटनेतील चोरटे रेल्वेने नाशिकरोडहून जाणार असल्याची माहिती मंडल सुरक्षा आयुक्त एच. श्रीनिवास राव यांनी दिली. हरफूल सिंह यादव यांनी मुंबईहून भुसावळला जाणाऱ्या काशी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले. नाशिकरोडला गाडी आल्यावर तीन नंबरच्या बोगीत तीन संशयित दिसले. त्यांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी आपली नावे मोहम्मद शहीद खान (वय ३७, प्रेमनगर, गोरेगाव, मुंबई), लाल केसर ददनराय (वय २७ गणेश चौक, शांती पाडा, वसई) व राकेशकुमार रामराज यादव (वय ३३, न्यू मुलुंड लिंक रोड, गोरेगाव) अशी सांगितली. पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून सर्व ऐवज जप्त केला. वसई पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील पाटील आणि पथकाने तिघांना ताब्यात घेतले.
आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक हरफूल सिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक दिनेश यादव, मनीष कुमार सिंह, दीपक सानप, धर्मेंद्र यादव, समाधान गांगुर्डे आदींनी ही कामगिरी केली.
हेही वाचा :
- Loksabha election 2024 : आता विविध परवान्यांसाठी असेल ‘एक खिडकी’
- पाहा व्हिडिओ! जपानच्या पहिल्या खासगी रॉकेट प्रक्षेपणानंतर काही सेकंदातच स्फोट
The post चोरीचे १७ तोळे दागिने रेल्वेने घेऊन जाताना तिघांना अटक appeared first on पुढारी.