cVIGIL : हेल्पलाइनसाठी केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रारीची नोंद

complaint pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निवडणूक आयोगाने आचारसंहिता कक्ष व टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. पण १९५० या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रार नोंदविता येते. त्यामुळे अन्य मोबाइल ऑपरेटर कंपन्यांची सेवा वापरणाऱ्या सर्वसामान्यांकडून आचारसंहिता भंगाची तक्रार करायची तरी कोठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुका पारदर्शक व निर्विघ्नपणे पार पाडाव्यात याकरिता नियडणूक आयोग आग्रही आहे. त्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार केल्यास शंभर मिनिटांमध्ये त्याचे निराकरण करण्याची ग्वाही खुद्द मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षात १९५० हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकही सुरू करण्यात आला आहे. परंतु सध्या बीएसएनएलच्या मोबाइल क्रमांकावरून हा क्रमांक लागतो. परिणामी, आचारसंहिता भंगाच्या तक्रारींची संख्या रोडावली आहे.

याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता ही तांत्रिक बाब आहे. लवकरच टोल-फ्री क्रमांकावर बीएसएनएलबरोबरच अन्य क्रमांकावरूनही संपर्क साधता यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

सी-व्हिजलचा पर्याय
आचारसंहिता उल्लंघनासंदर्भातील तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांकासोबत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल (cVIGIL) या मोबाइल ॲपचा पर्याय उपलब्ध आहे. ॲपच्या सहाय्याने तक्रारदाराला आचारसंहिता उल्लंघनाचा प्रकार निवडणे, घटनेचा तपशील, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच तक्रारदाराचे नाव गुप्त राखले जाणार आहे. पण, ही किचकट प्रक्रिया असल्याने त्यावर तक्रारी करण्यासाठी अद्यापही नागरिक पुढे येत नाहीत.

हेही वाचा:

The post cVIGIL : हेल्पलाइनसाठी केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रारीची नोंद appeared first on पुढारी.