नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा स्वीप समिती नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावतीने मतदार जनजागृतीसाठी आजपासून दोनदिवसीय गृह भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक जिल्हा स्वीप समिती नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या सूचनेनुसार आज जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यामध्ये सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी हे तालुका स्वीप नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका नोडल अधिकारी यांनी मतदार जनजागृती विशेष मोहिमेमध्ये आपल्या तालुक्यातील किती लोक सहभागी झाले त्याचबरोबर ग्रामपंचायत निहाय करण्यात आलेली उपक्रम याबाबत दस्तऐवजीकरण करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
गृहभेटी घेताना उन्हाची काळजी घेत कर्मचाऱ्यांनी सकाळ सत्रात व सायंकाळी गृहभेटी द्याव्यात उष्माघाताच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना खबरदारी असे देखील यावेळी सांगण्यात आले. गृहभेटी उपक्रमासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्याचे पालक अधिकारी हे या उपक्रमा दरम्यान तालुक्यास भेट देऊन उपक्रमाचा आढावा व अहवाल घेणार आहेत.
मतदारांना प्रेरीत करणे हा उद्देश
गृहभेटीद्वारे कर्मचारी हे मतदार जनजागृती, वोटर हेल्पलाइन अँपची माहिती, त्याचबरोबर 25 एप्रिल पूर्वी वोटर हेल्पलाइन ॲपद्वारे नवमतदार नोंदणी कशी करावी याबाबत नागरिकांना माहिती देणार आहेत. मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करणे व मतदानासाठी प्रेरीत करणे हा गृहभेटीचा मुख्य उद्देश आहे.
हेही वाचा: