जुने नाशिकमध्ये वाहनांसह घराची जाळपोळ

वाहनांची जाळपोळ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जुने नाशिक येथील जहांगीर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी मिळून चारचाकी, दुचाकी वाहनांवर ज्वलनशील पदार्थ टाकून वाहने पेटवली. तसेच एका घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

किती वाहनांचे नुकसान ?

  • सात दुचाकी, तीन कार व एक ट्रक आदी वाहनांचे नुकसान झाले.
  • याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात जाळपोळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

नवाज अब्दुल शहा (रा. अमरधाम रोड, नानावली, भद्रकाली) यांच्या फिर्यादीनुसार, भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये जाळपोळीचा प्रकार कैद झाला आहे. मेकॅनिक असलेले नवाज यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्यासह परिसरातील इतरांच्या चारचाकी व दुचाकी वाहने अमरधाम रोडवरील देशी दारूच्या दुकानासमोर, फेमस बेकरीजवळ व जहांगीर कब्रस्तानाजवळील परिसरात उभ्या होत्या. बुधवारी (दि. १५) मध्यरात्रीनंतर उशिरा ३.१५ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने परिसरातील सात दुचाकी, तीन कार व एक ट्रक अशा वाहनांवर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना आग लावली. आगीत दुचाकी व ट्रकचे अतोनात नुकसान झाले असून, चारचाकी वाहने सुदैवाने वाचली आहेत. आगीमुळे परिसरातील घरांना आग लागून जीवितहानी होण्याचा धोका असतानादेखील आरोपींनी वाहनांना आग लावल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले.

घर जाळण्याचाही प्रयत्न

दरम्यान, जाळपोळ करणाऱ्यांनी जहांगीर कब्रस्तानाजवळील घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचाही प्रयत्न केला. आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी वेळीच धाव घेत आग विझवली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी नानावली येथे ट्रकच्या टायरला लागलेली आग विझवली. या जाळपोळीत वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. टवाळखाेरांनी हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

तपास सुरू आहे…..

दुचाकीवरून आलेल्या तिघांनी जाळपोळ केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. जाळपोळ करणाऱ्यांना लवकरच अटक केली जाईल. तिघांना अटक केल्यानंतर जाळपोळ का केली, याचे कारण समोर येईल. – गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भद्रकाली पोलिस ठाणे

हेही वाचा –