‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

Nashik Dist pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘ठाणे हवे की नाशिक’ या कोंडीत शिवसेनेच्या शिंदे गटाला अडकविल्यानंतर आता भाजपने नाशिकची जागा ताब्यात घेण्यासाठी जाळे फेकले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची ‘वन-टू-वन’ चर्चा सुरू केली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांना निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाकडून पुन्हा विचारणा झाली असून, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे तसेच माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांचेही नाव उमेदवारीसाठी पुन्हा एकदा आघाडीवर आले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीनेही नाशिकच्या जागेसाठी आता जोर लावला आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी ही जागा राष्ट्रवादीला मिळण्यासाठी पक्ष कार्यालयात गुरुवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीची घोषणा होऊन आता महिनाभराचा कालावधी उलटला तरी महायुतीत मात्र उमेदवारीवरून संघर्ष सुरूच आहे. नाशिकच्या जागेवर मूळ हक्क सांगत शिंदे गटाचे युवानेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्यानंतर महायुतीतील वादाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जानेवारीतील नाशिक दौऱ्याचा संदर्भ देत नाशिकच्या उमेदवारीवर भाजपने दावा केला. पाठोपाठ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही नाशिकवर हक्क सांगितला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमधून उमेदवारीसाठी आपल्याला दिल्लीच्या नेतृत्वाने संदेश पाठविल्याचे सांगितल्यानंतर नाशिकवरून चुरस अधिकच वाढली. उमेदवारीला विलंब होत असल्याचे कारण देत नंतर भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले असले तरी ओबीसी समाज संघटना आणि समता परिषदेने भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. राष्ट्रवादीकडून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे तसेच माजी खासदार देवीदास पिंगळे यांचीही नावे चर्चेत आली आहेत. तर दुसरीकडे गोडसे यांनी तब्बल आठ वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत उमेदवारीसाठी गळ घातली आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली असताना अद्यापही गोडसे यांची उमेदवारी जाहीर होऊ शकलेली नाही. नाशिकची जागा भाजपला हवी असल्यामुळे महायुतीच्या उमेदवारीचा निर्णय लांबल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीची आज बैठक
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नाशिकच्या जागेवरील दावा कायम ठेवला आहे. किंबहुना ओबीसी समाज आणि समता परिषदेने भुजबळ यांनाच उमेदवारी मिळावी, असा आग्रह धरल्यानंतर राष्ट्रवादीनेही जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली असून, गुरुवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात शहर-जिल्ह्याची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली आहे.

चौथ्या ‘आप्पा’ची चर्चा
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे हेमंत आप्पा गोडसे यांचे नाव आघाडीवर आहे. ठाकरे गटाने उमेदवारी डावलल्याने माजी जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर हेही शिंदे गटाकडून चाचपणी करीत आहेत. तर माजी महापौर दशरथ आप्पा पाटील हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. महाविकास आघाडीची उमेदवारी न मिळाल्यास महायुतीचाही पर्याय आपल्यासमोर असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. आता नाशिकच्या निवडणूक रिंगणात चौथ्या आप्पाची एन्ट्री झाली आहे. स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी आप्पा चुंभळे हे महायुतीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भाजपकडून उमेदवारीची त्यांनी मागणी केली आहे.