त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती

त्र्यंबकेश्वर मंदिर,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबक शहरात विविध जातीत व धर्मांत असलेला सलोखा आजही कायम असल्याचा विश्वास शहरातील आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या सहविचार शांतता सभेत व्यक्त करण्यात आला. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी मंदिर प्रवेशाच्या कथित प्रकरणामुळे त्र्यंबकनगरीची बदनामी होत असून, येथे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे ठाम मत मांडले. अफवांमुळे आणि खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या एकांगी बातम्यांमुळे त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेला धक्का लागण्याची भीती सभेत व्यक्त करण्यात आली.

गेल्या पाच दिवसांपासून मंदिराच्या कथित प्रवेश प्रकरणावरून त्र्यंबकेश्वरबद्दल उलटसुलट माहिती राज्यभर पसरल्याने धार्मिक पर्यटकांच्या संख्येत काहीशी घट होऊ लागली आहे. त्यामुळे शहरातील आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी बुधवारी सहविचार शांतता सभेचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर होते. व्यासपीठावर शिवसेना लोकनेते शहरप्रमुख सुरेश गंगापुत्र, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, विश्वस्त भूषण अडसरे, गिरीश जोशी, रमजान कोकणी, लक्ष्मीकांत थेटे, रवींद्र सोनवणे, उमेश सोनवणे, प्रभाकर जोशी, बाळासाहेब सावंत, नबीयुन शेख, सुद्रद्दीन कोकणी, किरण चौधरी उपस्थित होते. या सभेस मुस्लीम समाजबांधवही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

सभेचे सूत्रसंचालन सुरेश गंगापुत्र यांनी केले. या सभेत त्यांनी त्र्यंबकनगरीत विविध जातीत व धर्मांत असलेला सलोखा आजही कायम असल्याचा विश्वास व्यक्त केला. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी त्र्यंबकनगरीची या प्रकरणावरून झालेल्या बदनामीबद्दल थेट शब्दांत नाराजी व्यक्त करताना प्रसारमाध्यमांचे कानही टोचले. खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी संयमी प्रकारे वार्तांकन करण्याचा सल्लाही दिला. मुळात येथे असा कोणताही प्रकार घडलेला नाही. परंतु सोशल मीडिया आणि अफवांमुळे त्र्यंबकेश्वरची भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची भीती अनेक उपस्थितांनी व्यक्त केली.

युवकांची नाराजी उघड

सभेस युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यांनीही आम्हाला शांतता हवी असून, बाहेरील व्यक्तींनी येथे येऊन गालबोट लावू नये, असे परखड मत मांडले. आमचे पोट पर्यटनावर असून, त्याला अजिबात धक्का बसू नये, अशी मागणी या सभेत केली.

हेही वाचा :

The post त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती appeared first on पुढारी.