नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मोठा गाजावाजा करून महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून ८८ पैकी ८२ शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला. या प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या थाटात ऑनलाइन उद्घाटनही करण्यात आले. मात्र थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे तब्बल ३८ शाळांमधील स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प झाली आहे. थ्री फेज कनेक्शनसाठी शिक्षण विभागाने विद्युत विभागाला साकडे घातले आहे.
महापालिकेच्या शाळांचा दर्जा तसेच शिक्षणाची गुणवत्ता वाढीस लागावी तसेच शहरातील सर्वस्तरातील गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने नाशिक महापालिकेने आपल्या सर्वच शाळा या स्मार्ट स्कूलमध्ये परावर्तित केल्या आहेत. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून ८२ शाळांसाठी जवळपास ७० ते ७५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यातील देखभाल दुरुस्तीच्या योजनेलाही महासभेने मंजुरी दिली आहे. स्मार्ट स्कूलच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाबरोबरच संपूर्ण अभ्यासक्रम हा डिजिटल पध्दतीने शिकविला जातो. त्यासाठी संबंधित ठेकेदाराच्या माध्यमातून संपूर्ण ॲप तसेच सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळांची रंगरंगोटी, दुरुस्ती, बॅँचेस, सीसीटीव्ही तसेच ऑनलाइन पध्दतीने हजेरी अशा सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या शाळांसह परिसरात ८८ प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. यापैकी ८२ शाळा या स्मार्ट स्कूल बनल्या आहेत. मात्र यातील ३८ शाळांमधील स्मार्ट स्कूलची यंत्रणा पुरेशा वीजपुरवठ्याअभावी विस्कळीत झाली आहे. यामुळे कुठली तरी यंत्रणा बंद करून यंत्रणा सुरू ठेवाव्या लागत असल्याने स्मार्ट स्कूलचा हा वनवास कधी संपणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या महिन्यात विद्युत विभागाकडे थ्री फेज वीजपुरवठ्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. परंतु, अद्याप त्यावर काही कार्यवाही नसल्याने संबंधित शाळांमधील यंत्रणा काही प्रमाणात कोलमडली आहे. स्मार्ट सिटी कंपनी निधी देण्यास तयार आहे. पुरेसा वीजपुरवठा मिळाल्यास सर्व यंत्रणा सुरळीत होईल. – बी. टी. पाटील, प्रशासनाधिकारी, मनपा.
हेही वाचा:
- Chaitra Utsav on Saptashringi gad | चैत्रोत्सवानिमित्त दररोज दीडशे जादा बसफेऱ्या
- AAP on BJP Manifesto: भाजपचे ‘संकल्प पत्र’ म्हणजे देशाला दिलेले ‘जुमला पत्र’; AAP मंत्री अतिशी
- Congress on BJP manifesto: भाजपच्या ‘संकल्प पत्रा’वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, “जनतेसाठी काही नाही….”
The post थ्री फेज कनेक्शन नसल्यामुळे स्मार्ट स्कूलची यंत्रणाच ठप्प appeared first on पुढारी.