दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच तालुक्यात भूगर्भातील पाणी पातळी कमी होत चालल्याने बोअरवेलवर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. तसेच धरणातील पाणीसाठा कमी होत असून, तालुक्यातील धरणातील पाणीपातळी कमी झाली आहे. असे असले, तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची स्थिती चांगली असल्याने अद्याप तरी गंभीर अशी टंचाई स्थिती दिसून येत नाही.
तालुक्यात साधारण मे महिन्याच्या मध्यानंतर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले असून, सध्या तळेगाव दिंडोरी हद्दीत एक विहीर अधिग्रहण करण्यात आली आहे, तर आगामी 15 दिवसांनंतर टँकरची मागणी होण्याची शक्यता तालुका प्रशासनाने वर्तविली आहे. यंदा तालुक्यात पावसाची सरासरी कमी असली, तरी धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे मांजरपाडा व वळण योजनांमुळे तालुक्यातील तिसगाव वगळता, उर्वरित धरणे 100 टक्के भरली आहेत. मात्र, आता धरणसाठा हळूहळू कमी होत चालला आहे. तालुक्यात सध्या तरी चाराटंचाई नाही मात्र भविष्यात चाराटंचाई निर्माण झाल्यास प्रशासकीय पातळीवर त्याबाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याचे तालुका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जलजीवनच्या 33 योजना पूर्ण
जलजीवन योजने अंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या १०४ योजनांपैकी ३३ योजना पूर्ण झाल्या असून, ७१ योजनांची कामे सुरू आहेत. या योजने अंतर्गत प्रत्येकाला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची संकल्पना असून, योजना चांगल्या पद्धतीने राबविल्यास भविष्यात कुठेही पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याचा दावा तालुका प्रशासनाकडून केला जात आहे.
टंचाईग्रस्त गावे : चंडिकापुर, वैतागपाडा, खुंटीचापाडा
– तालुक्यात हातपंपांची संख्या- ४०२
-सौरऊर्जा पंपांची संख्या ३६ असून, त्या पैकी १० सुरू, तर २६ बंद अवस्थेत आहेत.
तालुक्यातील धरणसाठा (टक्के)
करंजवण – 42
पुणेगाव – 9
वाघाड – 2
ओझरखेड – 33
तिसगाव – 12
आजमितीस पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही. मात्र, भविष्यात टंचाई निर्माण झाल्यास प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्यात येतील. ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल, तेथे टँकर दिला जाईल. उपाययोजनांसाठी प्रशासन सज्ज आहे. – मुकेश कांबळे, तहसीलदार.
हेही वाचा:
- Mobile Blast : घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट, चार मुलांचा मृत्यू
- Lok Sabha Election: मी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
- Lok Sabha election : अशी झाली पहिली निवडणूक
The post दिंडोरी तालुक्यात गंभीर पाणीटंचाई उद्धभवतेय; १५ दिवसानंतर टँकर appeared first on पुढारी.