एप्रिलमध्ये प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिम: प्रशिक्षण कार्यशाळा सुरु

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांर्तगत देशातील निवडक राज्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका कार्यक्षेत्रात १८ वर्षावरील प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम एप्रिलमध्ये राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात शालिमार येथील आयएमए सभागृहात प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली.

महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. शहरातील १८ वर्ष व त्यावरील सर्व नागरिक, पूर्वीचे टीबी रुग्ण, टीबी रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती, वय वर्ष ६० पेक्षा जास्त असलेले नागरिक, मधुमेहाचे रुग्ण, धूम्रपान करणारे, कुपोषित प्रौढ यांना बीसीजी लस महापालिका आरोग्य विभाग यांच्यामार्फत एप्रिलपासून देण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त, मनपा स्मिता झगडे यांनी केले आहे. बीसीजी लस लहान मुलांप्रमाणेच प्रौढांसाठीही उपयुक्त आहे. लस इतर आजारांविरोधातही परिणामकारक ठरल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळेच १८ वर्षांवरील नागरिकांसाठी एप्रिलपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. २०२५ पर्यंत टीबी निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबवला जात आहे. लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व खासगी-सरकारी यंत्रणेने एकत्र यावे, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण यांनी केले. या प्रशिक्षणासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, सहा.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा काळे, जागतिक आरोग्य संघटनाचे नाशिकचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश नांदापूरकर, वैद्यकीय नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ विजय देवकर, डॉ विनोद पावसकर, डॉ.योगेश कोशिरे, डॉ.गणेश गरुड, डॉ. युनिसेफचे समन्वयक सुमित कुदळे, शीत साखळी व्यवस्थापक अजित बुरचुडे यांनी सर्वेक्षणाबाबत योग्य नियोजन व आराखडा तयार करून मार्गदर्शन केले.

हेही वाचा:

The post एप्रिलमध्ये प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिम: प्रशिक्षण कार्यशाळा सुरु appeared first on पुढारी.