दृष्टीेदोष मतदारही कोणाचीही मदत न घेता बजावणार मतदानाचा हक्क

पेठ pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमवरच ब्रेललिपीमधील मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतपत्रिकेच्या सहाय्याने दृष्टिबाधित मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जिल्ह्यातील साडेचार हजार दृष्टिबाधित मतदारांना त्याचा फायदा होईल.

१८ व्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून, देशात सात टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून दृष्टिबाधितांसाठी या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएमवर ब्रेललिपीतील मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. एम-चार प्रकरातील ईव्हीएमवर नियमित मतपत्रिकेच्या बाजूला ब्रेललिपीतील मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या दृष्टिबाधित बांधवांना छापील व ईव्हीएमवरील ब्रेललिपीतील मतपत्रिकेच्या सहाय्याने त्यांच्या मनातील खासदाराला मतदान करता येईल.

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत ४,५०० च्या आसपास दृष्टिबाधित मतदार आहेत. त्यामुळे त्या-त्या मतदारसंघातील दृष्टिबाधित मतदारांचा आढावा घेत त्यानुसार मतदान केंद्रापर्यंत ब्रेललिपीतील छापील व ईव्हीएमवरील मतपत्रिका पोहोचविण्यासाठी प्रशासन तयारी करते आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दृष्टिबाधितांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना अधिक सुकर होणार आहे.

दिव्यांगांसाठी विशेष सोयी सुविधा
दृष्टिबाधितांप्रमाणेच जिल्ह्यातील दिव्यांग मतदार बांधवांसाठी मतदान केंद्रावर विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये दिव्यांगांना केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन सुविधा, मतदार रांगेत प्राधान्य, व्हिलचेअर, मेडिकल सुविधा आदी बाबी प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहेत.

हेही वाचा:

The post दृष्टीेदोष मतदारही कोणाचीही मदत न घेता बजावणार मतदानाचा हक्क appeared first on पुढारी.