द्वारका : पुढारी वृत्तसेवा – परिसरातील मतदान केंद्रांवर शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याने मतदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. मतदारयादीत अनेक मतदारांची नावेच नसल्याने मतदारांना मतदान न करता घरी परतावे लागले. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्यांचे खूप हाल झाले. मतदारयादीत परिसरातील अनेक नागरिकांची तसेच युवकांची नावे गायब झाली किंवा काढून टाकण्यात आली होती. त्यामुळे सकाळी 10 पासून येथे गोंधळ सुरू होता. शासकीय अधिकारी आणि पोलिसांशी वाद घालताना मतदार दिसले.
द्वारका-टाकळी रोड परिसरातील अटलबिहारी वाजपेयी शाळा, रवींद्रनाथ टागोर शाळा, सावित्रीबाई फुले शाळा, समाजकल्याण कार्यालय, जनता विद्यालय या सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
मागच्या वेळी मतदान केलेल्या अनेक नागरिकांची नावे यंदा वगळली गेल्यामुळे अशा नागरिकांनी संताप व्यक्त केला. मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांनी फॉर्म 17 भरून मतदान करू द्यावे, अशी विनंती निवडणूक कर्मचाऱ्यांकडे केली. परंतु आम्हास याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगत त्यांनी या नागरिकांची विनंती फेटाळली. त्यामुळे दिवसभर वादावादी सुरू होती. मागील वेळी मतदान केलेल्या 16 सदस्यांची एकाच कुटुंबातील नावे मतदारयादीतून गायब झाल्यामुळे या सदस्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, उन्हापासून संरक्षणासाठी शेड अशा सुविधा अनेक ठिकाणी नसल्याने ज्येष्ठांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उमेदवारांच्या सर्वच बूथवर नागरिकांना पिण्याचे पाणी व ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्यांची सुविधा केली होती. शाळांतील खोल्यांवर योग्य पद्धतीने क्रमांक टाकलेले नसल्यामुळे निवडणूक केंद्र शोधताना मतदारांचा गोंधळ उडत होता. फक्त आधार कार्ड दाखवून मतदान करता येईल का? असे प्रश्न अनेक नागरिक व नवमतदार विचारत होते.
हेही वाचा: