मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवाराविरोधात तिसरा पर्याय देण्यासंदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी दाभाडी येथील श्री लॉन्समध्ये मंगळवारी (दि.१६) चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस आक्षेप घेत दाभाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने एकच राडा झाला.
धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने नाशिकस्थित माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे नाराज नाशिकचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी राजीनामे दिले. डॉ. भामरे व डॉ. बच्छाव यांच्या उमेदवारीला होत असलेल्या अंतर्गत विरोधाचा मुद्दा ऐरणीवर घेत माजी आमदार गोटे यांच्या पुढाकारातून परिवर्तन मंचतर्फे धुळे लोकसभेसाठी सर्वसमावेशक तिसर्या पर्यायासाठी चाचपणी करण्यासंदर्भात दाभाडीला चिंतन बैठक लावण्यात आली होती. या बैठकीस निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक मात्र उमेदवारी न मिळालेल्या काँग्रेस व भाजप पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार या बैठकीस धुळ्याचे श्याम सनेर, सटाण्याचे डॉ. विलास बच्छाव, टेंभे येथील भाऊसाहेब आहेर आदींसह नेते उपस्थित होते. यावेळी डॉ. बच्छाव व सनेर यांनी भूमिका मांडली. त्यानंतर अहिरे हे भाषण करत असतानाच भाजपचे युवा कार्यकर्ते कमलेश निकम यांनी ‘ही बैठक का घेतली. दाभाडीचे कोणी आहे का’ अशी विचारणा करीत व्यासपीठावरील फलक काढून फेकला. त्यातून एकच गोंधळ उडून उपस्थित व निकम यांच्यात धक्काबुक्की झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कुणी तक्रार दिली नसल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
दरम्यान, ही पहिलीच बैठक होती. यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बैठक होईल. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन सर्वमान्य उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल, असे पत्रक चिंतन मंचचे नेते प्रशांत भदाणे व विजय वाघ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
दाभाडी येथे आमची सामाजिक बैठक होती. माजी आमदार गोटे यांच्या मेळाव्यात काय गोंधळ झाला याची कल्पना नाही. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. भाजपसोबत आहोत. तेथील गोंधळाशी आमचा काहीही संबंध नाही. – दीपक पवार, भाजपचे पदाधिकारी.
हेही वाचा: