धुळे : साक्री तालुक्यात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार

मद्यविक्री

धुळे : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून, १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार गुजरात राज्यातील बलसाड व बार्डोली लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार असल्यामुळे ५ ते ७ मे या दरम्यान संपूर्ण साक्री तालुक्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका हा गुजरात राज्याच्या सीमेला लागून आहे. तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निवडणूक खर्चविषयक बाबीच्या अनुषंगाने संवेदनशील घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने गुजरात राज्याच्या सीमेला लागून असलेल्या साक्री तालुक्यातील सर्व मद्यविक्री मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वीच्या ४८ तासांमध्ये तसेच मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका देखील मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा व धुळे या तालुक्यांना लागून आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे ज्याठिकाणी मतदान आहे अशा साक्री, शिरपूर तालुक्यापासून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व धुळे तालुक्यातील ५ किलोमीटर अंतरात असलेल्या मद्यविक्री अनुज्ञप्यालह तसेच नंदुरबार, जळगाव जिल्हा यांचे सीमेला लागुन शिंदखेडा व धुळे तालुक्यातील 5 किमी अंतरात असलेल्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या तसेच साक्री व शिरपूर तालुक्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वीच्या ४८ तासांमध्ये तसेच मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले आहे.

अनुज्ञप्ती बंदचे क्षेत्र असे….
नंदुरबार व जळगाव लोकसभा मतदारसंघ व मध्यप्रदेशातील खरगोन लोकसभा मतदारसंघात सोमवार, १३ मे रोजी मतदान होणार असून धुळे जिल्ह्यातील संपुर्ण साक्री व शिरपूर तालुका, नंदुरबार लोकसभा मतदार संघाला लागुन असलेल्या (नंदुरबार जिल्हा तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर तालुका) यांचे सीमेपासून उर्वरित धुळे जिल्ह्यात ५ किमी अंतर तसेच जळगाव जिल्ह्याच्या सीमेपासून धुळे जिल्ह्यात ५ किमी अंतरावर शनिवार, ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपासून रविवार, १२ मे रोजी पूर्ण दिवस तसेच सोमवार, १३ मे रोजी सांयकाळी ६ वाजेपर्यंत अनुज्ञप्ती बंद राहतील. तसेच मंगळवार, ४ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संपूर्ण धुळे जिल्ह्यात संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी वरील दिवशी सर्व दुकाने बंद ठेवावीत. तसेच मद्यविक्री व अन्य व्यवहार करू नयेत. मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल आणि संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही गोयल यांनी आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा: