नाशिकची माती नेणार कर्तव्य पथावर ; मेरी माती, मेरा देश उपक्रम

soil,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली येथे ९ ते ३० आॅगस्ट या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता सोहळा होणार आहे. या सोहळ्यात मेरी माती, मेरा देश उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गाव व शहरातील ब्लॉक पातळीवरून मातीचा कलश दिल्लीत नेण्यात येईल. अशा पद्धतीने देशातील प्रत्येक जिल्ह्यातून माती एकत्रित करून कर्तव्य पथावर बाग तयार करण्यात येणार आहे.

‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’च्या सांगता सोहळ्यानिमित्ताने ९ ते ३० आॅगस्ट या दरम्यान नवी दिल्ली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत देशातील सर्व पंचायती आणि ब्लॉक स्तरावरून ‘मेरी माती-मेरा देश’ उपक्रमाद्वारे माती गोळा करण्यात येणार आहे. देशभरातील तब्बल ७ हजार ५०० तालुक्यांमधील प्रत्येक गावातील माती गोळा करून त्याचा एक तालुकास्तरीय कलश तयार करून ताे नव्वी दिल्ली येथे नेण्यात येईल.

नाशिक जिल्ह्यात १६ ते २५ आॅगस्ट या कालावधीत प्रत्येक तालुक्यात व शहरी भागात कार्यक्रम राबविण्यात येईल. यावेळी स्वयंसेवक ब्लॉक स्तरावर जाऊन गावोगावची माती गोळा करून ती ठराविक ठिकाणी जमा करतील. जिल्हाभरातून गोळा केलेली माती २७ आॅगस्टपर्यंत दिल्लीत कर्तव्यदक्ष मार्गावर नेण्यात येईल. तर ३० आॅगस्टला कर्तव्यपथावर आयोजित सोहळ्यात गावातून आणलेली माती टाकून अमृत वाटिका तयार करण्यात येईल. या बागेत प्रत्येक ठिकाणी फलक बसवून त्यावर स्वातंत्र्यसैनिकांची नावे लिहिण्यात येतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

गावपातळीवर वृक्षारोपण

९ ते १५ आॅगस्ट या काळात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येईल. या कार्यक्रमांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येईल. जे हयात नाहीत त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार होईल. यासोबत सैन्य आणि पॅरा लष्कराशी निगडित लोकांनाही सन्मानित केले जाणार आहे. तसेच अमृत सरोवराकाठी किंवा गावातील शिलालेखांवर त्यांची नावे लिहून पंचायत इमारत व शाळेत बसविताना प्रत्येक गावात ७५ रोपांची लागवड केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

हेही  वाचा :

The post नाशिकची माती नेणार कर्तव्य पथावर ; मेरी माती, मेरा देश उपक्रम appeared first on पुढारी.