नाशिकच्या देवळालीत एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन

बिबट्याचे दर्शन www.pudhari.news

देवळाली कॅम्प(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दारणा नदीकाठी वसलेल्या व लष्कराच्या फायरिंगच्या परिसरात असलेल्या देवळाली कॅम्प शहराच्या विविध भागांत बिबट्यांचे वास्तव्य कायम असून, स्टेशन वाडीलगतच्या नाल्याजवळ तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवळाली कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने बिबट्यांना हक्काचे लपण्यासाठी ठिकाण बनले आहे, त्यातच दारणा नदीकाठच्या वंजारवाडी, लोशिंगे, लहवित, भगूर, दोनवाडे, राहुरी, नानेगाव, संसरी, शेवगे, दारणा या पट्ट्यासह देवळालीच्या विजयनगर, धोंडीरोड, लॅम रोड या भागांतही बिबट्याचे वास्तव्य कायम आढळून आले आहे. साधारणत: जानेवारी ते एप्रिल या दरम्यान दरवर्षी बिबट्यांचे येथे वास्तव्य असते.

दारणा पट्ट्यातील उसाची तोडणी झाल्यानंतर बिबटे नागरी वस्तीकडे कुच करतात. सध्या नाणेगाव व विजयनगर भागातील उसतोड सुरू असल्याने बिबट्याने आपला मोर्चा लगतच्या स्टेशनवाडी परिसरात हलवल्याचे दिसून येते. येथील नाल्यावर तीन बिबटे एकत्रित फिरत असल्याचे नागरिकांना निदर्शनास आले. काहींनी त्यांच्या छबी मोबाईलमध्ये टिपली आहे. या भागातील पाळीव प्राणी, कुत्रे, डुक्कर, कोंबड्या अशी जनावरे खाद्य मिळत असल्याने बिबट्यांचा मुक्काम सध्या या भागात आहे. सायंकाळी अंधार होतात नागरिकही आता घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. वन विभागाने या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे ठेवण्याची मागणी या परिसरातील अनिल जगताप, प्रवीण पवार, अक्षय पवार, सुयोग तपासे आदी नागरिकांनी केली आहे. हा भाग झोपडपट्टीचा असल्याने या परिसराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही येथील नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत वन विभागाने दक्षता घेण्याची गरज असल्याचे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे देवळाली कॅम्प शहराध्यक्ष आदर्श सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिकच्या देवळालीत एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन appeared first on पुढारी.