नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गेल्या वर्षात डेंग्यूने नाशिक शहर परिसरात थैमान घातल होते. या आजाराची रुग्णसंख्या ११९१वर पोहोचली होती. नव्या वर्षातही नाशिककरांभोवती डेंग्यूचा डंख कायम राहिला आहे. जानेवारीच्या पहिल्या पाच दिवसांतच डेंग्यूचे ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, या रुग्णांचे रक्ननमुने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात आले होते. त्यासंदर्भातील अहवाल आता प्राप्त झाला असून, वाढत्या थंडीमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव ओसरल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील सूत्रांकडून करण्यात आला आहे. (Nashik dengue update)
२०२३ या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत डेंग्यू तसेच व्हायरल तापाच्या साथीने नाशिककरांना बेजार करून सोडले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरातील डेंग्यूबाधितांचा आकडा हाताच्या बोटावर मोजण्याइतका होता. परंतु पावसाळ्यानंतर डेंग्यूचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. आॅगस्टमध्ये या आजाराचे जेमतेम ४७ रुग्ण होते. परंतु त्यानंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला. सप्टेंबरमध्ये २६१ तर, ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे १९३ बाधित आढळले होते. त्यानंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होईल, अशी अपेक्षा असतानाच नोव्हेंबरमध्ये तब्बल पावणेतीनशे जणांना डेंग्यूची बाधा झाली. नोव्हेंबरअखेर कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी डेंग्यूच्या प्रादुर्भावास हातभार लावणारी ठरली. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबरमध्येही या आजाराचे २०६ नवे बाधित आढळल्याने वर्षाअखेर डेंग्यू रुग्णसंख्या ११९१ वर पोहोचली. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागाने केलेल्या उपाययोजना केवळ कागदावरच राहिल्या. धूरफवारणी, जंतुनाशक फवारणी अपेक्षित प्रमाणात होऊ शकली नाही. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात मलेरिया विभागाचा कार्यभार डॉ. नितीन रावते यांच्या हाती आल्यानंतर डेंग्यू निर्मूलनाच्या उपाययोजना दिसू लागल्या आहेत. मात्र, नववर्षाच्या पहिल्या पाच दिवसांतच डेंग्यूचे ११ नवे रुग्ण आढळले आहेत. (Nashik dengue update)
डेंग्यूमुळे तिघांचे बळी (Nashik dengue update)
डेंग्यूमुळे गेल्या वर्षभरात तिघांचा बळी गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात नाशिकरोड विभागातील आनंदनगर परिसरातील एका व्यावसायिकाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात नवीन नाशिक विभागातील डीजीपीनगर-कामटवाडे परिरसरातील एका डॉक्टरचा तसेच पंचवटीतील म्हसरूळ परिसरातील ६५ वर्षीय वृद्ध महिलेला डेंग्यूची लागण झाल्याने मृत्यू ओढावला होता.
नववर्षाच्या पहिल्या पाच दिवसांत डेंग्यू पॉझिटिव्ह आढळलेल्या बाधितांच्या चाचण्या या डिसेंबरअखेर करण्यात आल्या होत्या. तपासणी अहवाल जानेवारीच्या १ ते ५ तारखेदरम्यान प्राप्त झाले आहेत. वाढत्या थंडीमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होत आहे. घरपरिसरात आठवडाभरापेक्षा अधिक काळ पाणी साचून राहणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी.
– डॉ. नितीन रावते, मलेरिया विभागप्रमुख
हेही वाचा
- Nashik Slum Survey : झोपडपट्ट्या सर्वेक्षणाचे शासन आदेश धाब्यावर
- Vinayak Damodar Savarkar : सावरकरांची प्रतीकात्मकरित्या तुरुंगातून सुटका करणार : रणदीप हुड्डा
- Nashik Fog News | धुक्यात हरवले नाशिक, तीन दिवस अवकाळीचे संकट
The post नाशिकमध्ये नव्या वर्षातही डेंग्यूचा डंख कायम appeared first on पुढारी.