नाशिक, इगतपुरी: वाढलेल्या मतांचा टक्का वाजे यांच्या पारड्यात

इगतपुरी (नाशिक) : वाल्मीक गवांदे

यंदाच्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत आदिवासी बहुल मतदारसंघ असलेल्या इगतपुरी- त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात ७२ टक्क्यांच्या वर मतदान झाले. गतवेळेस हा आकडा केवळ ५८ टक्क्यांवर पोहोचला होता. यंदा वाढलेला टक्का हा महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पारड्यात टाकले. वाजे यांना इगतपुरी मतदारसंघातून १ लाख १५ हजार ८५, तर हेमंत गोडसे यांना ५८ हजार ५२ इतके मतदान झाले. इगतपुरी-त्र्यंबकवासीयांनी वाजे यांना ४३ हजार ५३३ इतके मताधिक्य दिले. त्यामुळे त्यांचा विजय अधिक सुकर झाला.

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार तथा शिवसेना उपनेत्या निर्मला गावित व शिवसेनेची बुलंद तोफ निवृत्ती जाधव यांचे मतदारसंघात सत्तास्थान भक्कम करणारे मताधिक्य अधोरेखित झाले आहे. दुसरीकडे महायुतीमधील नेते माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड आणि शिवराम झोले या नेत्यांनीदेखील ताकद लावली. अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम यानिमित्ताने झाली, असे म्हणायला हरकत नाही. महायुतीचे उमेदवार गोडसे यांच्या विजयासाठी मतदानाआधी शेवटच्या काही दिवसांत जोरदार अर्थपूर्ण घडामोडी घडल्या. त्याचा विपरीत परिणाम झालेला बघायला मिळाला. मतदानाच्या दिवशी शेवटच्या काही तासांमध्ये मतदार उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडले, तो या घडामोडींचा उद्रेक समजला जातो. त्याने गोडसे यांना फटकाच बसला. दुसरीकडे मतदारांना वाजे यांच्यातील सामान्य माणूस, त्यांची प्रतिमा भावली.

  • राजाभाऊ वाजे – १,१५,०८५
  • हेमंत गोडसे – ५८,०५२

आदिवासी अन् मराठा समाजाचे विजयासाठी निर्णायक मतदान, दलित मतदारांची विखुरलेली संख्या अशी या मतदारसंघाची वैशिष्ट्ये आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रमुख उमेदवारांबरोबरच अपक्ष शांतिगिरी महाराज, ‘वंचित’चे करण गायकर यांचाही मतदारसंघात बोलबाला होता, मात्र, मतदारांच्या मनात वाजे यांचे स्थान पक्के झालेले दिसले. परिणामी, मतांचे फारसे ध्रुवीकरण झाले नाही.

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार तथा शिवसेना उपनेत्या निर्मला गावित, शिवसेना नेते निवृत्ती जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आदींनी सातत्याने लोकसंपकांद्वारे राजाभाऊ वाजे यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले.

नेते आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळाचा निर्णायक वापर करण्यात्त राजाभाऊ वाजे यशस्वी ठरले, हेमंत गोडसे यांना इगतपुरीतुन एकतफीं मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा होती. यामध्ये त्यांना काहीअंशी यश मिळाले असले तरी कार्यकर्त्यांच्या यंत्रणेचा वापर करून घेण्यात आणि निवाडा करण्यात त्यांच्या चुका झाल्याचेही दिसते.

विधानसभेची रंगीत तालीम

इगतपुरी मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसची सत्ता कायम असते. एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमाने आगामी विधानसभेचे चित्र स्पष्ट झाले असून, आमदार खोसकर व माजी आमदार निर्मला गावित यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. महायुतीकडून माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, पांडुरंग बाबा गांगड व शिवराम झोले हे सपशेल अपयशी ठरल्याचीच चर्चा मतदारसंघात अधिक रंगलेली आहे.

हेही वाचा: