नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा ‘चांदवड’ तालुका

चांदवड www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे

रंगमहालातून…

तालुक्यातील शेतकरी हा पारंपरिक शेती व्यवसाय न करता आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तांत्रिक शेती करू लागला आहे. पर्यायाने आजवर पिकवली जाणारी बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांऐवजी द्राक्ष, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवरसह भाजीपाला या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. तालुक्यातून दररोज शेकडो टन शेतीमालाची विक्री होत असल्याने एकेकाळी दुष्काळी म्हणवणारा चांदवड तालुका आज सुजलाम्-सुफलाम् व सधन तालुका म्हणून नावारूपाला येत आहे. शेती व्यवसायाच्या प्रगतीमुळे चांदवड तालुका जिल्ह्याच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा ‘कणा’ झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

चांदवड तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतो. पर्यायाने पर्जन्यमान अत्यल्प असल्याने कायमचीच दुष्काळी परिस्थिती. त्यामुळे तालुक्यात पारंपरिक पिकांचीच लागवड केली जात असे. शेतीमालांचे उत्पादन कमी असल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थितीही खालावलेली होती. आज मात्र तंत्रज्ञानाचा वापर तरुण शेतकरी शेतीसाठी वापर करू लागल्याने पारंपरिक पिकांऐवजी आता नवनवीन पिकांची लागवड शेतात केली जात आहे. पर्यायाने पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन शेतकर्‍यांना आर्थिक फायदाही होताना दिसत आहे. त्यात प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, ड्रॅगन फ्रूट, भाजीपाला पिकांची लागवड केली जात आहे. उत्पादित शेतीमालाच्या विक्रीसाठी शेतकरी चांदवड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिक किंवा मुंबई या ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये जातो. तालुक्यातील शेतकर्‍यांनी पिकवलेला शेतीमाल खाण्यास अत्यंत चविष्ट असल्याने व्यापारी, नागरिकांची मोठी मागणी आहे. एकंदरीत शेती व्यवसायातील प्रगतीमुळे एकेकाळी दुष्काळी संबोधल्या जाणार्‍या चांदवड तालुक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदलला आहे.

शेतीसाठी पाणी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पाणी असेल, तर तुम्ही बारमाही शेती करू शकता. हा मुद्दा हेरून तालुक्यातील सुमारे 70 टक्के शेतकर्‍यांनी शेतात शेततळी बांधली आहेत. या शेततळ्यांतून आवश्यक तेव्हाच शेतीपिकांना पाणी दिले जाते. एरवी शेततळी ही पाण्याने भरलेलीच असतात. उन्हाळ्यात पाणी कमी पडते, त्यावेळी या शेततळ्यातील पाण्याचा वापर शेतीमालासाठी केला जातो. विशेष म्हणजे पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी पिकांना पारंपरिक पद्धतीने पाणी न देता ते ड्रीपद्वारे दिले जाते. शेतीतील या बारीक-सारीक गोष्टींचा विचार केल्यामुळे कमी पाण्यात एकावेळी अनेक पिकांची लागवड शेतकरी करताना दिसत आहेत. पर्यायाने शेतीमालाच्या उत्पादनात वाढ होऊन आर्थिक मोबदल्यात मोठा फायदा होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिकद़ृष्ट्या सक्षम होऊन स्वतःचे भांडवल स्वतः तयार करू लागला आहे.

सुमारे 60 टक्के वाटा
जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगाव या जागतिक स्तरावरील बाजारपेठांत दररोज विक्रीसाठी येणारा कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवरसह भाजीपाला हा चांदवड तालुक्यातील सुमारे 60 टक्के शेतकर्‍यांचा शेतीमाल असतो. त्यामुळे बाजारपेठेत होणार्‍या आर्थिक व्यवहारात तालुक्यातील शेतकर्‍यांचा मोठा वाटा असतो.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा 'चांदवड' तालुका appeared first on पुढारी.