नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्णवेळ सुरू करावी अशी होतेय मागणी

कोल्हापूर-मुंबई मार्गावर 15 ऑक्टोबरपासून नियमित विमानसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्पाइस जेट कंपनीकडून नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद केल्यानंतर, पुन्हा ही सेवा सुरू होऊ शकली नाही. वास्तविक, नाशिक-दिल्ली विमानसेवेला उद्योग, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातून प्रचंड मागणी आहे. दरम्यान, इंडिगो कंपनीने आपल्या सुधारित वेळापत्रकात हॉपिंग फ्लाइटने हैदराबाद आणि अहमदाबादमार्गे नाशिक-दिल्ली विमानसेवेला हिरवा कंदील दर्शविला आहे. हैदराबादमार्गे दररोज, तर अहमदाबादमार्गे आठवड्यातून एकच दिवस ही सेवा असणार आहे. दरम्यान, नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्णवेळ सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

कधी नव्हे ते गेल्या काही दिवसांपासून ओझर विमानतळावरून इंडिगो कंपनीकडून पाच शहरांना जोडणारी विमानसेवा सुरळीत सुरू होती. मात्र, इंदोर आणि अहमदाबाद या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेत अचानक कपात केल्याने, पुन्हा एकदा नाशिकच्या विमानसेवेला घरघर लागतेय की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, इंडिगो कंपनीने आपल्या नव्या वेळापत्रकात केवळ इंदोर शहराला जोडणाऱ्या सेवेत कपात केल्याचे दिसून येत आहे. इंदोर शहरासाठी आता तीनच दिवस म्हणून गुरुवार ते शनिवार अशी सेवा सुरू राहणार आहे. अन्य गोवा, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद या शहरांना नियमित विमानसेवा सुरू असल्याचे वेळापत्रकात स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त तब्बल २० शहरांना जोडणारी हॉपिंग फ्लाइट सेवा उपलब्ध करून दिली आहे. हैदराबाद व अहमदाबादमार्गे नाशिक-दिल्ली विमानसेवेचा समावेश आहे. हैदराबादमार्गे दररोज, तर अहमदाबादमार्गे आठवड्यातून बुधवारीच ही सेवा असेल.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू करावी, अशी सातत्याने मागणी होत आहे. स्पाइस जेट या कंपनीकडून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होती. त्यास प्रतिसादही उत्तम होता. मात्र, अचानकच तांत्रिक बिघाडाचे कारण देत कंपनीने ही सेवा बंद केली. पुढे कंपनीने नाशिकहून आपल्या सर्व सेवा बंद केल्याने, नाशिकच्या विमानसेवेला घरघर लागली होती. अशात इंडिगो कंपनीने आपल्या सेवा सुरू केल्याने, नाशिकच्या व्यापार, उद्योग क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला आहे.

हॉपिंग फ्लाइटने या शहरांना सेवा
अमृतसर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, कोइम्बतूर, दिल्ली, जयपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, तिरुअनंतपूरम‌्, वाराणसी, चंदीगड, जयपूर, मंगळुरू, रायपूर, विजयवाडा, राजमाहेंदरी, कोझीकोड या शहरांना हॉपिंग फ्लाइटने जोडणारी सेवा सुरू आहे.

हेही वाचा

The post नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्णवेळ सुरू करावी अशी होतेय मागणी appeared first on पुढारी.