नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर

नाशिक वनपर्यटन,www.pudhari.news

नाशिक :

पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून खाली येणारे पांढरेशुभ्र नभ, डोंगर-दर्यांमधून वाहणारे धबधबे, धबधब्यांच्या पाण्यामुळे अंगावर पडणारे तुषार, डोंगर आणि माळरानांनी नेसलेला हिरवा शालू आणि त्यातच पाऊस घेऊन येणारी पावसाची हळुवार झुळूक असे अद्भुत वातावरण नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत अनुभवण्यासाठी मिळते. दोन्ही जिल्ह्यांना निसर्गाचे समृद्ध कोंदण लाभल्याने बाराही महिने पर्यटकांची नेहमीच पसंती मिळत असते. निसर्गसौंदर्यांची भुरळ पाडणारे बहुतांश पर्यटनस्थळे वन व वन्यजीव विभागाच्या अखत्यारित असल्याने वनपर्यटनाला मोठा वाव निर्माण झाला आहे.

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य :
पावसाळा थांबल्यानंतर गुलाबी थंडी सुरू झाल्यानंतर कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरातील निर्सगाचे सौंदर्य अधिक फुलते. सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर कळसुबाई शिखरासह अभयारण्याच्या परिसरात रतनगड, मदनगड, अलंग, कुलंग, भैरवगड आजोबा डोंगर, हरिश्चंद्रगड, कोंबड किल्ला हे ऐतिहासिक गड-किल्ले, तर पंदा, सोनकी, कारवीसारखे फुलांचे पठार तर रंधा फॉल, बाहुबली, वैशाली, वसुंधरा, कोळटेंबे, नाणी, अम्ब्रेला फॉल हे मोठे धबधबे आहेत. त्यामुळे पुणे, नगर, नाशिक, मुंबई, ठाणे आदी शहरांहसह आजूबाजूच्या विविध भागांतून पर्यटकांची पावले ही भंडारदरा, रतनगड परिसरात पर्यटनासाठी येतात.

सांदण व्हॅली :

पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटकांना वर्षा पर्यटनाचे वेध लागतात. निसर्ग आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात झुंबड उडते. या परिसरातील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात. अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या साम्रद गावाच्या शिवारातील सांदण व्हॅली पर्यटकांसाठी पर्वणीच असते. आशिया खंडातील सर्वांत खोल दर्‍यांमध्ये सांदण व्हॅलीचा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सांदण व्हॅलीत पर्यटकांना प्रवेश बंदी असते.

काजवा महोत्सव :

पावसाने हजेरी लावली की, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवरील भंडारदरातील जंगलात अंधारात काजव्यांची लखलखती दुनिया अवतरते. या प्रकाशमय कीटकांमुळेआकाशातील तारे जमिनीवर अवतरल्याचा भास होतो. हाच निसर्गानुभव घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक मे अखेरीस भंडारदर्‍यात दाखल होतात. भंडारदरा धरण क्षेत्रातील मुरशेत, मुतखेल, पांजरे, घाटघर आणि रतनवाडीच्या जंगलात हिरडा, सादडा, बेहडा वृक्षांवर काजवे चमकतात. हा काजवा महोत्सव पर्यटकांसाठी पर्वणीच असते. जूनमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर निसर्ग आविष्कार थांबतो. अवघ्या वीस-पंचवीस दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल होते.

ट्रॅकरची पंढरी :

पावसाळा संपल्यानंतर हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, आजोबा डोंगर, रतनगड, पावर गड, भैरवगड, अलंग-मलंग-कुरंग इत्यादी ठिकाणी महाराष्ट्रातून  ट्रेकर्स ट्रेकिंगला येत असतात.

राज्यप्राण्याला सुरक्षित अधिवास
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचा राज्यप्राणी अर्थात शेकरूला कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात सुरक्षित अधिवास लाभत आहे. वन्यजीव विभागासह स्थानिक आदिवासींना देवराई असलेल्या जंगल परिसरातील मानवी हस्तक्षेप रोखण्यात विभागाला यश आल्याने शेकरूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शेकरू आपली घरटी तयार करतात. दुर्मीळ तसेच शेड्युल एकमध्ये असलेल्या शेकरूची मे महिन्याच्या शेवटच्या, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रगणना केली जाते. या प्रगणनेत शेकरूंच्या संख्येत वाढल्याचे समाधानकारक चित्र आहे.

नांदूरमध्यमेश्वर : स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या तसेच रामसरचा दर्जा प्राप्त झालेल्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर बनले आहे. स्वछंद विहार करणार्‍या पक्ष्यांना अभिप्रेत असलेले विरळ सदाहरित जंगल आणि माळरान परिसरामुळे चारशेहून अधिक विविध प्रकारच्या वनस्पती प्रजाती आढळून येतात. केवळ हिवाळी हंगामासाठी नांदूरमध्यमेश्वरमध्ये न येता हे पक्षी आता याच ठिकाणी रमल्याचे चित्र आहे. या पक्ष्यांचे प्रजनन नांदूरमध्यमेश्वरच्या नैसर्गिक सानिध्यात होत असल्याने त्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर appeared first on पुढारी.