नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी

वाजे, कोकाटे www.pudhari.news

सिन्नर : संदीप भोर

नाशिक लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. तथापि, गत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे आणि यंदा माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या निमित्ताने सिन्नर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. (Lok Sabha Election 2024 )

लोकसभेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने उमेदवारी द्यावी, म्हणून आमदार कोकाटे हटून बसले होते. अंतिमत: शिवसेना-भाजप युती आणि हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इरेला पेटलेला कोकाटे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात अपक्ष म्हणून शड्डू ठोकले. त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली. माणिकरावांच्या ‘ट्रॅ्नटर’ने संपूर्ण मतदारसंघात धुरळा उडवून दिला. सिन्नर विधानसभा मतदार संघातील उमेदवार असल्याने येथील बहुतांश मतदार कोकाटे यांच्या पाठीशी उभे राहतील याबाबत खात्री असल्याने खा. गोडसे यांनाही घाम फुटला होता. तथापि, मोदी लाटेत त्यांनी ऐतिहासिक विजय मिळविला. आमदार कोकाटे यांना 1 लाख 34 हजारांच्या आसपास मते मिळाली होती. त्यात सिन्नर मतदार संघातील सुमारे 91 हजार मतांचा समावेश होता. त्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करताना कोकाटे यांनी केलेल्या नियोजनबध्द प्रचाराचे अनेकांना कौतुक वाटले. (Lok Sabha Election 2024 )

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही आरंभी नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडावी, म्हणून मागणीने जोर धरला होता. त्यातही आमदार कोकाटे यांचे नाव अग्रभागी होते. त्याचे कारण असे, काही महिन्यांपूर्वी सिन्नर तालु्नयात विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आलेल्या विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार कोकाटे यांना खासदार करण्याचा विचार असल्याचे वक्तव्य केले होते. पण, मध्यंतरी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. उमेदवारीच्या चर्चेत आमदार कोकाटे यांचे नाव मागे पडले. आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या तिकीटावर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारीचे संकेत मिळू लागले. युती-आघाडीचे जागा वाटप, उमेदवारांच्या घोषणा अंतिम टप्प्यात असताना नाशिक जिल्ह्याच्या राजकीय पटलावर माजी आमदार वाजे यांच्या उमेदवारीच्या चर्चेने फेर धरला आहे. आधी ठाकरे गटाच्या नेत्यांशी आणि नुकतेच नाशिक दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्याशी केलेले गुफ्तगू राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारीच्या चर्चेला पुष्टी देणारे ठरले. काल-परवा आमदार कोकाटे यांनीही बोलता बोलता नाव न घेता राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी मिळू शकते, असा उल्लेख केला. त्याने वाजे हे चर्चेतला चेहरा असल्याचेच स्पष्ट झाले.

वाजे कुटूंबीयांनी उमेदवारीस स्पष्ट नकार दिला असून स्पर्धेतील अन्य काही उमेदवारांच्या पाठीशी ठाम राहण्याचा शब्द वरिष्ठ नेत्यांना दिला आहे. तरीदेखील राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारीची चर्चा काही थांबायला तयार नाही.

वरिष्ठांचा आदेश आल्यास कार्यकर्ते सज्ज… (Lok Sabha Election 2024 )

वाजे यांनी उमेदवारीबाबत उत्सुकता दर्शवलेली नसली तरी कार्यकर्ते मतांची गोळाबेरीज करीत सोशल मीडियावर वाजे यांचा उल्लेख ‘भावी खासदार’ असा करताना दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने जर राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी मिळालीच तर आपण सज्ज आहोत, असाच काहीसा संदेश यातून प्रतिध्वनित होत आहे.

हेही वाचा-

The post नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी appeared first on पुढारी.