नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी

बिबट्या pudhari.news

नाशिक (सिन्नर) :  पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील दोडी येथे गोठ्यात शिकारीसाठी घुसलेल्या बिबट्याला गायीने अक्षरश: लाथांनी तुडवले. गर्भगळीत होऊन निपचित पडलेल्या या बिवट्याला वनविभागाच्या पथकाने भुलीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेतले.

दोडी खुर्द शिवारात कचरू भिका आव्हाड (६५) हे गट नं २६८ मध्ये वास्तव्यास असून शेजारीच त्याचा जनावराचा गोठा आहे. रविवारी (दि. ३) सकाळी ६ च्या सुमारास कचरू आव्हाड हे गुराच्या गोठ्याची स्वच्छता करण्यास गेले असता त्याना बिबट्या नजरेस पडला. आव्हाड यांनी या संदर्भात वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विभागाच्या रेस्क्यू टीमचे डॉ. मनोहर नागरे, वनपाल अनिल साळवे, वनरक्षक चंद्रमणी तांबे आणि वनमजुरांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने ट्रॅन्क्युलायझर गनच्या साहाय्याने बिबट्याला बेशुद्ध केल्यानंतर जाळे टाकून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर जाळे टाकून त्याला ताब्यात घेतले. जखमी बिबट्यावर मोहदरी येथील वनोद्यानात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथील रेस्क्यू पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्वसंरक्षणार्थ बिबट्या राहिला पडून
गोठ्यात बांधलेल्या गायी पाहून बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र गायींनीही रौद्ररूप धारण करत बिबट्याचा प्रतिकार सुरू केला जवळ येणाऱ्या बिबट्याला लाथानी जखमी केले. रात्रीच्या अंधारात जखमी झालेला बिबट्या क्षीण होऊन गायींना बांधण्याचा खुंटा आणि भिंतीच्या मधोमध स्वसंरक्षणार्थ बसून राहीला.

नागरिकांची तोबा गर्दी
बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने गर्दी हटविण्यात आली. ट्रॅन्क्युलायझर गनच्या साहाय्याने बिबट्याला बेशुद्ध केल्यानंतर जाळे टाकून त्यास ताब्यात घेण्यात आले.

The post नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी appeared first on पुढारी.