‘निमा’त बैठक : उद्योगांवर वीजदरवाढीचे संकट

वीज pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महावितरण कंपनीने सरासरी दहा टक्के वीज दरवाढ केल्याने, याचा मोठा फटका लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना बसणार आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून, याविरोधात उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सातपूर, येथील निमा कार्यालयात झालेल्या उद्योजकांच्या बैठकीत या दरवाढीचा निषेध करण्यात आला असून, राज्यभरातील औद्योगिक संघटनांची भूमिका जाणून घेतल्यानंतर आंदोलनाचा पवित्रा निश्चित केला जाणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले आहे.

निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत उद्योजकांनी दरवाढीचा तीव्र निषेध केला. एकीकडे ‘एक देश, एक कर’ अशा पद्धतीने जीएसटीची अंमलबजाणी केली जात असताना, विजेच्या दरांबाबत मात्र प्रत्येक राज्यात वेगवेगळे दर आकारले जात आहेत. महाराष्ट्रात शेजारील राज्याच्या तुलनेत अधिक दर असल्याने, मोठे उद्योग समूह राज्यात येण्यास धजावत नाहीत. केवळ महावितरण कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे व वीज नियामक मंडळाकडून सातत्याने चुकीची माहिती दिली जात असल्याने, राज्याचा औद्योगिक विकास खुंटत आहे. महावितरण कंपनीच्या या गलथान कारभाराविषयी आतापर्यंत उद्योजक सामंजस्यांची भूमिका घेत होते. मात्र महावितरण कंपनी, वीज नियामक आयोगाच्या मदतीने अवास्तव दरवाढ करून लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना संपविण्याचेच काम करीत असल्याचा संताप उद्योजकांकडून व्यक्त करण्यात आला. वीज नियामक आयोगाने तीन वर्षांकरिता क्रमाक्रमाने केलेेली ही दरवाढ मान्य नसल्याचेही उद्योजकांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील इतर औद्योगिक संघटनांशी चर्चा करून दरवाढीबाबत पुढील दिशा ठरविली जाणार आहे. सर्व औद्योगिक संघटनांनी समान भूमिका व्यक्त केल्यास, तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाणार असल्याचेही यावेळी उद्योजकांनी स्पष्ट केले आहे.

वीज दरवाढीचा असा होणार परिणाम
– उत्पादन खर्च वाढेल.
– उत्पादनांची किंमत वाढण्याचा धोका.
– उत्पादनाच्या किमतीत त्या प्रमाणात माल घेणाऱ्यांकडून वाढ होत नसल्याने उद्योजकांना तोटा.
– राज्यातील उद्योगांमध्ये येणारी गुंतवणूक कमी होईल.
– सोलरचा वापर करण्यावरसुद्धा अनेक बंधने महावितरणने टाकल्याने, ते हटविणे गरजेचे.

मार्च २०२४ पर्यंतचे वीजदर
लघुदाब उद्योगांसाठी : ० ते २० किलोवाॅट – ५३० रुपये प्रतिमहिना, २० किलोवाॅटपासून पुढे – ३५३ रुपये प्रतिकिलोवाॅट ॲम्पिअर प्रतिमहिना. उच्चदाब उद्योगांसाठी : ४९९ रुपये प्रतिकिलोवाॅट ॲम्पिअर प्रतिमहिना.

१ एप्रिल २०२४ पासून लागू झालेले दर
लघुदाब उद्योगांसाठी : ० ते २० किलोवाॅट ः ५८३ रुपये प्रतिमहिना, २० किलोवाॅटपासून पुढे : ३८८ रुपये प्रतिकिलोवाॅट ॲम्पिअर प्रतिमहिना. उच्चदाब उद्योगांसाठी : ५४९ रुपये प्रतिकिलोवाॅट ॲम्पिअर प्रतिमहिना.

प्रलंबित याचिकांबाबत संशय
वीज दरवाढीप्रश्नी निमासहीत राज्यातील इतर औद्योगिक संघटनांच्या याचिका प्रलंबित असताना, अशा पद्धतीने दरवाढ करणे योग्य आहे का? असा प्रश्न उद्योजकांनी उपस्थित केला. येणाऱ्या काळामध्ये या याचिकांच्या बाबत उलटा निकाल लागल्यास, महावितरणची भूमिका काय असेल, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला.

लघु व मध्यम उद्योगांसाठी वीज हेच त्यांचे प्रमुख रॉ-मटेरियल आहे. त्यामुळे विजेच्या दरात एक रुपयाची देखील वाढ झाल्यास त्याचा मोठा फटका या उद्योजकांना बसतो. इतर राज्यांत विजेचे दर आवाक्यात असतानाही उद्योगांना तिथे अनुदान दिले जाते. महाराष्ट्र मात्र अनुदानासाठी चार विविध विभाग केल्याने, उद्योजकांना त्याचा फारसा लाभ न होता, अन्यायच होत आहे. त्यामुळे ‘एक देश, एक वीजदर’ लागू करावा, ही आमची मागणी आहे. – धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा.

हेही वाचा:

The post 'निमा'त बैठक : उद्योगांवर वीजदरवाढीचे संकट appeared first on पुढारी.