नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभेच्या नाशिक व दिंडाेरी मतदारसंघाची मतमोजणी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मतमोजणीच्या तयारीवर निवडणूक विभागाकडून अंतिम हात फिरवला जात आहे. मतमोजणी केंद्रावरील नियुक्त कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रापासून ते आयोगाला सादर करायची माहितीपर्यंत बारीकसारीक गोष्टीचा आढावा घेतला जात आहे.
जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात मतदान पार पडल्यानंतर आता साऱ्यांच्याच नजरा येत्या मंगळवारी (दि.४) होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. अंबड येथील केंद्रीय अन्नधान्य व वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी नाशिक तसेच दिंडोरीतून कोण बाजी मारणार याची सर्वत्र उत्सुकता आहे. सामान्य नागरिकांमध्ये निकालावरुन दररोज विविध चर्चा रंगता आहे. दरम्यान, निवडणूक शाखेकडून मतमोजणीच्या दृष्टीने तयारी ही अंतिम टप्यात पोहोचली आहे.
निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना मतमोजणीसाठीचे पहिले प्रशिक्षण देण्यात आले. सोमवारी (दि. ३) अंबड येथील गोदामात दुसरे व अंतिम प्रशिक्षण दिले जाणार आहे. दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर मोजणीकरिता आवश्यक साहित्याची जुळवाजळव करण्यावर भर दिला जात आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, उमेदवारांच्या प्रतिनिधींना पासेस देणे, मतमोजणीवेळी प्रत्येक फेरीनंतर आयोगाला सादर करायची माहिती, मतमाेजणी पूर्ण झाल्यावर सिडींग अशा विविध पातळ्यांवर सध्या तयारी केली जात आहे. त्यामध्ये कोठेही कमतरता भासणार नाही, याकरिता वरिष्ठ अधिकारी बारीक नजर ठेऊन आहेत.
सुरक्षेवर विशेष लक्ष
मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. त्यादृष्टीने अंबड येथील गाेदामाच्या परिसरातील सुरक्षेवरदेखील विशेष लक्ष दिले जात आहेत. मत मोजणीच्या दिवशी गोदामाकडे येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक नियोजन करणे, एमआयडीसी कामगारांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे अशा छोट्या-छोट्या गोष्टींवरदेखील बारकाईने काम केले जात आहे.
हेही वाचा: