नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहर पोलिस भरतीच्या प्रक्रियेस मंजुरी मिळाल्यानंतर रिक्त पदांचा तपशील तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहर पोलिस दलातील शिपाई पदाच्या ११८ जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पाच मार्चपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे.
सन २०२३ मध्ये रिक्त झालेल्या ११८ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यासंदर्भात आदेश काढले आहेत. अनुकंपा तत्त्वावरील अनेक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनापूर्वी मुंबई व इतर जिल्ह्यांतून आंतरजिल्हा बदलीअंतर्गत सुमारे दोनशे अंमलदार नाशिकमध्ये नियुक्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरण्यात अडथळे येत होते. मात्र, आता पदे रिक्त असल्याने तिथे इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्यासाठी policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर ३१ मार्चपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज नोंदवता येणार आहेत. भरतीसाठी ०२५३-२३०५२३३ किंवा २३०५२३४ हे हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत. सर्व पोलिस घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार असल्याने उमेदवाराला एका ठिकाणी एका पदासाठी अर्ज करता येणार आहे.
नाशिक शहर भरती – २०२४
प्रवर्ग – रिक्त जागा
खुला – ५०
आर्थिकदृष्ट्या दुर्बल – २०
ओबीसी – ०२
विशेष मागास – ०४
अनुसूचित जमाती – २३
अनुसूचित जाती – १९
एकूण -११८
The post पाच मार्चपासून पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात appeared first on पुढारी.