नाशिक : पुढारी वृत्तसेवा– पंचवटीमधील तपोवन मैदानावर येत्या १२ तारखेला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दादा भुसे व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी शुक्रवारी (दि. ५) तपोवनातील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी आयोजनाबाबत मंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद नाशिकला मिळाले, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. दि. १२ ते १६ जानेवारी दरम्यान हा महोत्सव होणार असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १२) होईल. यानिमित्ताने महाराष्ट्राला मोठी संधी आहे. हा महोत्सव देदीप्यमान करण्याची मोठी संधी नाशिककरांना आहे. युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
मैदानाची पाहणी करून कुठलीही कमी राहणार नाही, यासाठी सर्वतोपरी काम करण्याच्या सूचना यावेळी भुसे यांनी यंत्रणेला केल्या. याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
- अंतराळातील कचर्याचे आव्हान
- शिर्डी : साईचरणी 10 दिवसांत 16 कोटींचे दान!
- आपचे बडे नेते काँग्रेसमध्ये, काँग्रेस विरुद्ध आप जुंपण्याची शक्यता
The post पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी appeared first on पुढारी.