पैसे-दारूची अवैध वाहतूक करणारे पोलिसांच्या रडारवर

हद्दपार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सोमवारी (दि. २०) होणाऱ्या लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात होण्यासाठी शहर पोलिसांनी ३१३ गुन्हेगारांना त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवून तीन दिवस शहरातून हद्दपार केले आहे. हद्दपार केलेल्यांमध्ये राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचाही समावेश आहे. त्यामुळे काहींनी या कारवाईबाबत नाराजी वर्तवत कारवाई मागे घेण्याची मागणी पोलिसांकडे केली.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला असून, सोमवारी (दि. 20) मतदान होणार आहे. पाेलिसांनी बंदोबस्ताचे नियाेजन केले असून, मतदान केंद्रनिहाय बंदोबस्त तैनात आहे. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह छुपा प्रचार करणारे, पैसे-दारूची अवैध वाहतूक करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. त्याचप्रमाणे गुन्हेगारांंवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यानुसार मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदारांवर कोणाचाही दबाव नको, निर्भय वातावरण हवे यासाठी शहर पोलिसांनी शहरातील ३१३ जणांना दि. १७ ते २० मे दुपारी 3 पर्यंत शहरातून हद्दपार केले आहे. हद्दपार केलेल्यांवर दोन किंवा दाेनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार पंचवटी विभागातील ५९, सरकारवाडा विभागातील ६८, अंबड विभागातील सर्वाधिक १०४ व नाशिक रोड विभागातील ८२ गुन्हेगारांना शहरातून हद्दपार केले आहे. हद्दपार केलेल्यांना मतदान करता येणार असून, मतदान केल्यानंतर त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पोलिस ठाणेनिहाय हद्दपार
पंचवटी —- १८
म्हसरूळ —- २८
आडगाव —- १३
मुंबई नाका —- २९
गंगापूर —- ०४
भद्रकाली —- २९
सरकारवाडा —- ०६
अंबड —- ३९
सातपूर —- ३०
इंदिरानगर —- २५
चुंचाळे पोलिस चौक —- १०
नाशिक रोड —- ३०
उपनगर —- २८
देवळाली कॅम्प —- २४

३ हजार ५१८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायदा, एमपीडीए, मोक्का, तडीपारी, फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत व शस्त्रबंदी कायद्यानुसार ३ हजार ५१८ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. त्यात १ हजार ८०७ टवाळखोरांवर कारवाई असून, चौघांना स्थानबद्ध, २ टोळ्यांवर मोक्का, २३५ दारूबंदी कायद्यानुसार, १६ गुन्हे अमली पदार्थप्रकरणी दाखल आहे. शस्त्र बाळगल्याप्रकरणी ९७ गुन्हे दाखल आहेत. तर इतरांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्या आहेत.

बडगुजरांना दिलासा
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संशयित सुधाकर बडगुजर यांना तडीपारीपासून दिलासा मिळाला आहे. दि. ९ मे रोजी नोटीस बजावल्यानंतर त्यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली. १८ मे रोजी त्यांच्या तडीपारीसंदर्भात पुन्हा उपायुक्तांच्या कार्यालयात सुनावणी झाली. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयातून काही कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा त्यांच्या वकिलाने केला. त्यानुसार पुन्हा 10 दिवसांची मुदत बडगुजर यांना देण्यात आली. त्यांच्या तडीपारीवरील निर्णय पुढे गेल्याने बडगुजर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

आयुक्तांसमवेत शिष्टमंडळाची भेट
शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना तडीपारीच्या नोटिसा मिळाल्याने शहरप्रमुख विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी तडीपारीच्या कारवाईसंदर्भात सविस्तर माहिती दिली. ज्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या, त्यांच्यावरील गुन्ह्यांचीही यादी वाचण्यात आली. तसेच कारवाईत चूक नसून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचे कर्णिक यांनी शिष्टमंडळास सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने निवेदन दिले.

हेही वाचा: