भुसेंच्या कटकारस्थानामुळेच हिरे तुरुंगात : संजय राऊत

संजय राऊत, दादा भुसे,

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मालेगावच्या मंत्र्यानेच कटकारस्थाने रचून अद्वय हिरे यांना तुरुंगात टाकल्याचा गंभीर आरोप करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी हिरे कुटुंबीयांची भेट घेत हे दिवसही निघून जातील, असा शब्दांत कुटुंबीयांना धीर दिला आहे.

शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी मालेगावमध्ये पालकमत्री भुसेंसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. मालेगाव बाजार समितीत भुसेंचा पराभव केल्यानंतर विधानसभेतही भुसेंचा पराभव करण्यासाठी हिरेंनी आपली ताकद पणाला लावली असताना आता, हिरेंभोवती पोलिस कारवाईचा ससेमिरा लागला आहे. हिरेंच्या शैक्षणिक संस्थांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर जिल्हा बँकेतील अपहार प्रकरणी हिरेंना अटक झाली आहे. सध्या हिरे हे पोलिस कोठडीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले असून, शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटातील संघर्ष अधिकच टोकाला गेला आहे. पालकमंत्री भुसे हे राजकीय सुडापोटी हिरेंवर कारवाई करत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी केल्यानंतर बुधवारी (दि.२२) नाशिक दौऱ्यावर आलेले खा. राऊत यांनीही माध्यमांशी संवाद साधताना भुसेंवर तोफ डागली.

खा. राऊत म्हणाले की, मालेगावचे मंत्री हिरेंना घाबरले आहेत. त्यामुळे मालेगावच्या मंत्र्याने कटकारस्थान करून हिरेंना तुरुंगात टाकले आहे. परंतु, अशा कारवाईने आम्ही घाबरत नाहीत, असे सांगत, मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला नाशिकमध्ये आलो असल्याचे राऊत यांनी सांगितले. हिरे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी मालेगावलाही जाणार आहे. मालेगावमध्ये पक्षाचेही कार्यक्रम आहेत. तसेच न्यायालयातही जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

जरांगे-भुजबळ वादावर भाष्य टाळले

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील व ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वादावर भाष्य करणे राऊत यांनी टाळले. जरांगे-पाटील महाराष्ट्रभर सभा घेत असून, त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. जरांगे व भुजबळ दोघेही एकमेकांना प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ असल्याचे सांगत त्यांच्यातील वादावर अधिक भाष्य करण्यास राऊत यांनी नकार दिला.

उद्धव ठाकरे नाशकात येणार

नाशिकमध्ये पुढील महिन्यात राज्यव्यापी कार्यक्रम होणार असल्याचे सांगत त्या कार्यक्रमांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील हजर राहणार असल्याची माहिती खा. राऊत यांनी दिली. त्या कार्यक्रमांच्या तयारीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. त्यात कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला जात असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

The post भुसेंच्या कटकारस्थानामुळेच हिरे तुरुंगात : संजय राऊत appeared first on पुढारी.