राजापूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– येवला तालुक्यातील राजापूर-ममदापूर रस्त्यावर मातीपासून भांडी बनविण्याचे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित झाले आहे. याठिकाणी कुंभार कारागिरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे महाराष्ट्रातील पहिले पाॅटरी क्लस्टर ठरले आहे. यात प्रामुख्याने कुंभार व्यवसायास चालना देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ या संस्थेने अर्थसहाय्य दिले आहे. राजापूर, ममदापूरसह परिसरातील कुंभार कारागिरांना यातूनच रोजगार उपलब्ध होणार आहे. (Pottery Cluster)
बदलत्या काळात मातीची पारंपरिक भांडी मागे पडल्याने अनेक कारागिरांनी कुंभार व्यवसायाकडे पाठ फिरवली होती. परंतु, याच मातीच्या भांड्यांना नावीन्यांचा आकार देऊन कुंभारांना उभारी देण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी राज्यातील पहिले पाॅटरी क्लस्टर ममदापूरला उभे राहिले आहे. या केंद्रातून कारागिरांना हस्तकलेच्या माध्यमातून नवनवीन वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. त्यातून कुंभारांना प्रगतीचे नवे व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Pottery Cluster Mamdapur)
स्वयंपाकघरात वापरापासून शोभेच्या वस्तू तयार करण्याचे येथे प्रशिक्षण घेतलेले कारागीर वाल्मीक शिरसाठ हे मातीची आकर्षक भांडी व वस्तू बनवत आहेत. शिरसाठ बंधूंनी हस्तकलेच्या माध्यमातून साकारलेल्या वस्तू बाजारात भाव खात आहेत. अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत मातीच्या भांड्यांना मागणी वाढत आहे. या पाॅटरी क्लस्टरमधून अनेकांना प्रेरणा मिळेल, असा या केंद्रांचा मानस आहे.
कारागिरांना प्रशिक्षणवेळी अखिल महाराष्ट्र कुंभार विकास समाज अध्यक्ष मनोहर जगदाळे, दत्ता डाळसकर, कुंभार समाज येवला तालुकाध्यक्ष नंदकुमार सोनवणे, ममदापूरचे सरपंच विजय गुडघे, सदस्य गोरख वैद्य, मच्छिंद्र साबळे, पोलिसपाटील बाळासाहेब वैद्य यांच्या हस्ते पूजन झाले. संदीप मोरे, वाल्मीक शिरसाठ, सुनील शिरसाठ, दादासाहेब शिरसाठ, बाळकृष्ण कुंभार पुणे हे कुंभार कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. (Pottery Cluster Mamdapur)
यंत्रासाठी ८० टक्क्यांपर्यंत अनुदान
भांडी, वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक यंत्र हे २० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ८० टक्क्यांपर्यंत अनुदानाची तजविज करण्यात आली आहे. यंत्राच्या सहाय्याने चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन वस्तू साकारणे सहज शक्य होईल. महाराष्ट्रातील एकमेवर हे केंद्र आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
खुणावतेय मोठी बाजारपेठ
मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन त्यावर नक्षीकाम करण्याची कला कारागीर अवगत करतील. तेही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून. आधुनिक जीवनशैलीमुळे होणारे बदल व आरोग्यदायी मातीच्या भांड्यांना वाढती मागणी लक्षात घेऊन या भागात माती क्लस्टर केंद्र साकारले आहे. जुन्या काळात मातीच्या भांड्यांचाच वापर केला जात असे. तोच वापर आता शहरी व ग्रामीण भागातदेखील होऊ लागला आहे. त्यामुळे मोठी बाजारपेठ खुली होत आहे.
लवकरच उद्घाटन
मातीचा तांब्या, ताट, पातेले, मातीचे कुकर, खापर, रांजण, माठ, महिलांना मकर संक्रांतीच्या सणासाठी बोळके, वाण असे विविध प्रकारचे भांडे बनविले जात आहेत. या केंद्राचे उद्घाटन काही दिवसांनी होणार आहे. परंतु, तत्पूर्वीच कुंभार कारागिरांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरूदेखील झाले आहे. कारागिरांची वाढती मागणी पाहून यंत्र मागणी करून उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
हेही वाचा :
- राज ठाकरेंची वेळेत हजेरी, पदाधिकाऱ्यांना उशीर : मनसेमधील नाराजीनाट्य समोर
- सांगली : स्मशानातील राख अखेर त्याचा जीव घेऊन गेली
- आढळरावांनी आता हाती घड्याळ बांधावे : कार्यकर्त्यांचा सूर
The post ममदापूरला महाराष्ट्रातील पहिले पाॅटरी क्लस्टर appeared first on पुढारी.