नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, त्यांच्या प्रचारात मनसे पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. महायुतीच्या नाशिक आणि दिंडोरी मतदार संघातील दोन्ही उमेदवारांनी गुरुवारी (दि. २) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनात मनसेचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय नाशिक मतदार संघासाठी समन्वयक म्हणून नेमणूक केलेले अभिजित पानसे हे देखील शक्तिप्रदर्शन रॅलीत उपस्थित होते.
गुढीपाडवा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर, मनसे पदाधिकारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय होणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी महायुतीकडून आम्हाला विचारात घेतले जात नसल्याचा सूर आवळल्याने, बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार जाहीर होताच, मनसे ॲक्टीव्ह मोडवर आली आहे. मनसेचे सर्व पदाधिकारी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रीय झाल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. गुरुवारी (दि.२) महायुतीचे नाशिक लाेकसभा मतदार संघाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदार संघाच्या डॉ. भारती पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यात मनसेचे देखील पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अभिजीत पानसे, किशोर शिंदे व गणेश सातपुते या तिघांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या तिघांवर महायुतीच्या प्रचारात स्थानिक पदाधिकारऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी सोपविली आहे. मतदार संघात दौरा करण्याबरोबरच मनसे कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन महायुतीच्या उमेदवाराला प्रचारात मदत करण्याबाबतची रणनिती या समन्वकांकडून आखली जाणार आहे. दरम्यान, मनसेनी महायुतीच्या प्रचारात उडी घेतल्याने त्याचा उमेदवारास कितपत फायदा होईल, हे निकालअंतीच स्पष्ट होणार आहे.
वरिष्ठ स्तरावरून प्राप्त आदेशानुसार महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. समन्वयक अभिजित पानसे हे देखील नाशिकमध्ये असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराचे नियोजन केले जात आहे. – सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे.
राज ठाकरेंची सभा?
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून नियोजन देखील केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवार जाहीर होत नसल्याने, सभेचे नियोजन केले गेले नव्हते. मात्र, लवकरच याबाबतची अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: