महाराष्ट्राच्या चेरापुंजीतच पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती

इगतपुरी : वाल्मिक गवांदे

पावसाचे माहेरघर व महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात पावसाळ्यात सुमारे चार हजार मिलीमिटर पावसाची नोंद होते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हाेऊनही केवळ नियोजनाअभावी तालुकावासीयांच्या नशिबी दरवर्षी पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती करावी लागत आहे. इगतुपरी शहरातही गेल्या पाच वर्षांपासून आठवड्यातून केवळ तीन दिवस पाणीपुरवठा केला जात आहे. तर नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या आदिवासी पाड्यांवर पाइपलाइन पोहोचवली मात्र अद्याप त्यांना पाणी मिळालेले नाही.

इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. त्यामुळे येथे मोठी धरणे उभारण्यात आली. मात्र, या धरणांचा तालुकावासीयांना कोणताही फायदा झालेला नाही. त्यामुळे धरण उशासी आणि कोरड घशासी अशी अवस्था तालुकावासीयांची झाली आहे. इगतुपरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भावली धरणातून १६ कोटी रुपये खर्चून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, अद्यापही अंतर्गत जोडण्या झालेल्या नसल्याने त्यांना आठवड्यातून केवळ तीन दिवस पाणी मिळत आहे. तर तर इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातुरवाडी, वाघाचा झाप, मेंगाळ झाप या वस्तीमधील दोनशे ते अडीचशे लोकसंख्या वस्ती असलेल्या आदिवासी बांधवांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या वाडीच्या नागरिकांना थेट दोन किलोमिटर असलेल्या घाटनदेवी मंदिर समोरील रस्ता नसलेल्या खोल उंट दरीतील झऱ्यातील पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे.

मागील वर्षी येथील आदिवासी नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर नगरपरिषदेने फक्त पाइपलाइन केली. मात्र, वर्ष उलटून गेले तरीही या पाइपलाइनला पाणी आलेच नाही. याबाबत येथील आदिवासी नागरिकांनी आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांच्याकडे समस्या मांडली. त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून तालुक्यातील आदिवासी बांधवांना प्रथम पाणी द्यावे अन्यथा मुंबईला जाणारे पाणी अडवू, असा इशारा दिला आहे.

आमच्या वाड्या गेल्या ३० वर्षांपासून नगरपरिषद हद्दीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप ही आमच्याकडे नळ जोडणी करण्यात आलेली नाही. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत लोक प्रतिनिधी व नगरसेवक मत मागतांना तुमच्या समस्या सोडवू, असे आश्वासन देतात. मात्र, आजपर्यंत कोणीही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही.

– वासुदेव देवराम वाघ, स्थानिक नागरिक

—–

या ठिकाणी हाकेच्या अंतरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा तळेगाव डॅम आहे. या डॅममधून महामार्गावर असलेल्या अनेक पंचतारांकित हॉटेल व रिसॉर्ट यांना २४ तास पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आमच्या आदिवासी बांधवांवर नगरपरिषद अन्याय करत आहे.

– लकी जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी काँग्रेस

हेही वाचा –

The post महाराष्ट्राच्या चेरापुंजीतच पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती appeared first on पुढारी.