महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियमानुसार महापालिका बजावणार कारवाई नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियम सुधारित २०२१ नुसार रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात लावणे खासगी रुग्णालयांवर बंधनकारक असताना शहरातील ९० टक्के रुग्णालयांमध्ये या नियमांचे पालन केले जात नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात येणार असून, त्यानंतरही नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली आहे. (Maharashtra Nursing Home Act)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने रुग्णांवरील उपचाराबाबतचे दर निश्चित करत परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार रुग्णालयाच्या दर्शनी भागात बेडनिहाय उपचाराचे दर लावण्याचे बंधनकारक केले होते. कोरोना काळात याची यशस्वी अंमलबजावणी झाली. मात्र, कोरोना ओसरल्यानंतर रुग्णालयातील दरपत्रकही गायब झाले होते. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने त्याचाच आधार घेत २०२१ मध्ये महाराष्ट्र सु॰ूश्रा अधिनियमात सुधारणा करत खासगी रुग्णालयांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णालयाचे दरपत्रक व रुग्ण हक्क सनद लावणे बंधनकारक केले होते. त्यासंदर्भातील आदेश राज्यातील खासगी रुग्णालयांसह त्यांच्या नियंत्रण ठेवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवत या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, त्याचीही अंमलबजावणी होत नाही. वैद्यकीय विभागाने शहरातील ५८० रुग्णालयांना यासंदर्भात तीन वेळा पत्रके काढून रुग्णालयाच्या दर्शनी भागात दरपत्रक तसेच रुग्ण हक्क सनद लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, या रुग्णालयांनी वैद्यकीय विभागाच्या या पत्रकांनाच केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे वैद्यकीय विभागाने आता दरपत्रक व सनद दर्शनी भागात न लावणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात येणार असून, नियमाची अंमलबजावणी न केल्यास दंडात्मक कारवाईसह थेट रुग्णालयाची परवानगीही रद्द केली जाणार आहे. (Maharashtra Nursing Home Act)

महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियम सुधारित २०२१ नुसार खासगी रुग्णालयाकडून कारवाई होत नसल्यामुळे संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात येणार आहे. नियमाचे पालन केले नाही तर, कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. – डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, मनपा.

तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक
महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्टनुसार (Maharashtra Nursing Home Act) सर्व खासगी रुग्णालयांनी रुग्ण हक्क सनद व दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील खासगी रुग्णालय या नियमाची अंमलबजावणी करीत नसल्याचे आढळल्यास १८००२३३४२४९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण यांनी केले आहे.

The post महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियमानुसार महापालिका बजावणार कारवाई नोटिसा appeared first on पुढारी.