नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन प्रमुख जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गामुळे मुंबई-पुणे-नाशिक ही शहरे द्रुतगती महामार्गाने जोडली जाणार असून, महाराष्ट्रातील द्रुतगती महामार्गाचा सुवर्णत्रिकोण यामुळे पुर्ण होणार आहे.
पुणे, नगर व नाशिक ही शहरे महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे असून कृषी अवजड उद्योग, लघु व मध्यम उद्योग, आयटी कंपनी आदींच्या दृष्टीने महत्त्वाची शहरे आहेत. मुंबई-पुणे-नाशिक ही शहरे महराष्ट्रातील सुवर्णत्रिकोणाचा भाग आहे. प्रस्तावित द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे-नाशिक ही शहरे द्रुतगती महामार्गाने जोडली जातील. प्रस्तावित आखणी रेषेवरील सर्व शहरे व आसपासच्या प्रदेशाची आर्थिक व पर्यायाने सामाजिक उन्नती अधिक गतिमाननेते होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या द्रुतगती महामार्गाची आखणी रेषा राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर या शहराजवळून प्रस्तावित केली आहे. या भागाचा विकास शीघ्रगतीने होण्याच्या दृष्टीने प्रस्तावित महामार्ग हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. सदर महामार्गामुळे मोठे उद्योग, शिक्षणसंस्था, आयटी कंपन्या, कृषी उद्योग केंद्र महामार्गालगत नव्याने विकसित होऊ शकतील. त्यामुळे स्थानिकांना उत्तम रोजगार व उत्तम बाजारपेठ उपलब्ध होईल.
नाशिक-पुणे अवघ्या अडीच तासात
सद्यस्थितीत नाशिक-पुणे प्रवासाला किमान पाच तास लागतात. या महामार्गामुळे हे अंतर दोन-अडीच तासात गाठता येईल. दळणवळण गतिमान झाल्याने पुणे, नाशिक शहरांमधील लघु, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्था या उद्योगांना मोठा फायदा होईल.
अशी आहे द्रुतगती महामार्गाची रुपरेषा
१. पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा भाग (पुणे ते शिर्डी)- १३४.३६ कि.मी.
२. शिर्डी इंटरचेंज ते नाशिक निफाड इंटरचेंज (सुरत-चेन्नई द्रुतगती महामार्गाचा भाग)- ६०.४० कि.मी.
३. सुरत-चेन्नई द्रुतगती महामार्ग ते नाशिक (नाशिक निफाड राज्य महामार्गाचा भाग)- १८.२५ कि.मी.
The post मुंबई-पुणे-नाशिक सुवर्णत्रिकोण होणार पूर्ण appeared first on पुढारी.