मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ

शिंदे गट मेळावा pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना ज्यांनी तिलांजली दिली, महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, मित्रपक्ष भाजपशी बेईमानी केली त्यांना आम्हाला गद्दार म्हणावण्याचा काय अधिकार? असा थेट सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामकरणाविरोधी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. आता न्यायालयालाही गद्दार म्हणणार का? लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीनही टप्प्यांत महायुतीला घवघवीत यश मिळत असल्याचे दिसत असून, उर्वरित दोन टप्प्यांतील जागा तर महायुतीचेच बालेकिल्ले आहेत. त्यामुळे मतदारांनी नाकारलं तर ते मतदारांनाही गद्दार म्हणायला मागे-पुढे पाहणार नाहीत, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

लोकसभा निवडणूक आणि विजय करंजकर यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी किंगमेकरच्या भूमिकेत राहिले. मुख्यमंत्रिपद त्यांना नगण्य वाटले. उद्धव ठाकरेंची मात्र मुख्यमंत्रिपदाची सुप्त इच्छा होती. बाळासाहेबांना यांची ताकद माहिती होती. बाळासाहेब हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्री केले नसते. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला नेहमी लांब ठेवले, त्याच काँग्रेसशी उद्धव ठाकरेंनी सलगी केली. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांची शिवसेना वाचविण्यासाठी, काँग्रेसच्या दावणीतून सोडविण्यासाठी आम्ही धाडसी निर्णय घेतला. ५० आमदार, १३ खासदार जेव्हा बाहेर पडायचा निर्णय घेतात तेव्हा कारणही मोठे असते. मात्र यांना गद्दार, खोक्यांशिवाय काही येत नाही. यांना खोके नाही तर कंटेनर लागतो, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. कारण ते त्यांना जास्त ओळखतात, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली.

बाळासाहेब शिवसैनिकांना नेहमी सवंगडी मानायचे, हे घरगडी समजतात. त्यामुळेच शिवसेना स्वबळावर सत्तेत येऊ शकली नाही. राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक, आणि नंतर मलादेखील घालवले. मनोहर जोशींना भरसभेतून व्यासपीठावरून उठवले. रामदास कदम यांचाही असाच अपमान केला. माणसं झुंजवत ठेवली तर पक्ष कसा मोठा होणार? असा सवाल करत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर पुन्हा विराजमान करण्यासाठी धनुष्यबाणाला मत द्या. महाराष्ट्रात मिशन ४५ पूर्ण होईल, असा दावादेखील शिंदे यांनी केला. उपनेते तथा जिल्हा संपर्कनेते करंजकर यांनी प्रास्ताविक केले. पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे यांचेही यावेळी भाषण झाले. व्यासपीठावर उपनेते अजय बोरस्ते, आमदार सुहास कांदे, बबनराव घोलप आदी उपस्थित होते.

संविधान बदलाची अफवा
मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर देशाचे संविधान बदलणार, अशी अफवा विरोधकांकडून पसरवली जात आहे. पराभव समोर दिसत असल्यामुळेच काँग्रेसकडून या अफवा पसरविल्या जात आहेत. मुळात काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निवडणुकीत पराभव करत अपमान केला होता. काँग्रेसच्याच सत्ताकाळात तब्बल ८२ वेळा संविधानात दुरुस्ती केली गेली. मोदींनी मात्र दरवर्षी संविधान दिन साजरा करण्याची प्रथा सुरू केली, असे नमूद करत ‘जब तक सूरज चांद रहेगा, तब तक संविधान रहेगा’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

भाजपचे ३० आमदार फोडणार होते!
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत लोकांची सहानुभूती मिळणार नाही, असा दावा करत उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात काँग्रेस, राष्ट्रवादीला हाताशी धरून भाजपचे २५ ते ३० आमदार फोडण्याच्या तयारीत होते. भाजपच्या पाच बड्या नेत्यांना जेलमध्ये टाकून महाविकास आघाडीला मजबूत करणार होते, याची कुणकुण लागल्यानंतर मी यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

 

हेही वाचा: