मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. येथील पोलिस कवायत मैदानासह शहरातील १४ ठिकाणी ईद-उल-फित्रनिमित्त सामूहिक नमाजपठण झाले. बुधवारी चांदरात्र होऊन गुरुवारी (दि. ११) रमजान ईद साजरी करण्यात आली.
कॅम्पातील मुख्य ईदगाह असणार्या पोलिस कवायत मैदानाकडे येणारे शहरातील प्रमुख मार्ग मुस्लीम बांधवांच्या वर्दळीने फुलले होते. येथील कवायत मैदानावर जामा मशिदीचे प्रमुख तथा आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी नमाज पढविली. या ठिकाणी लाखो
मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली.
प्रेम, करुणा, अहिंसेचा संदेश देत माणुसकीचा धर्म जपण्याचे आवाहन मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी मुस्लीम बांधवांना केले. शहरात गेल्या महिनाभर रमजान महिन्याचा उत्साह होता. गुरुवारी (दि. ११) ईद साजरी झाली. मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी दुवापठण केले. जगात जिथे निष्पाप, निरपराध लोकांवर अन्याय होत असेल, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. माणुसकी श्रेष्ठ असून, ती जपा. अहिंसा, प्रेम, करुणा हाच अल्लाहचा पैगाम असल्याचे मौलाना मुफ्ती इस्माईल म्हणाले. देशातील सध्याचे सरकार हे लोकशाहीविरोधी असल्याची टीका
करुन मुफ्ती इस्माईल यांनी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत नागरिक म्हणून मतदान करण्याचे आवाहन केले.
मुख्य नमाजपठणानंतर एकात्मता चौकात मौलाना मुफ्ती यांचा विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांसह शासकीय अधिकारी, एकात्मता
समिती व शांतता समिती सदस्यांनी सत्कार केला. नमाजपठणास होणार्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी चौकाचौकांत व मुख्य रस्त्यांवर लोखंडी जाळ्या लावून वाहतूक अन्य मार्गांनी वळविली होती. ईदगाह मैदान परिसरासह संवेदनशील ठिकाणी एसआरपीएफ व आरसीपी दलाच्या जवानांसह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मुख्य पोलिस कवायत मैदान ईदगाहसह शहरातील १४ ठिकाणी ईदची नमाज अदा केली गेली.
तसेच प्रार्थनास्थळांमध्येदेखील शहरातील नमाज अदा करून दुवापठण केले गेले. मनपा, महसूल व पोलिस प्रशासनाने ईदच्या पोर्शभूमीवर पोलिस कवायत मैदानावर व ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केली होती. तालुक्यातील दाभाडी, खाकुर्डी, झोडगे आदींसह अनेक गावांतही सामूहिक नमाजपठण झाले.
तरुणाने फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज
मुख्य नमाज पठणावेळी मौलाना मुफ्ती इस्माईल संबोधित करीत असताना, त्यांनी पॅलेस्टाइन मुस्लीम बांधवांसाठी दुवा करा, असे आवाहन केले. यावेळी गर्दीतून तरुणाने हातात पॅलेस्टाइनचा ध्वज घेऊन तो फडकावला. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. याविषयी विचारणा केली असता, मौलाना यांनी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले. या तरुणाने हा ध्वज मैदानात कसा आणला? त्याचा हेतू काय होता? हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत.
हेही वाचा:
- Eid Ul Fitr 2024: ‘हिंदोस्तान को तरक्की अता फरमा’
- Eid-e-Milad-un-Nabi | मानवी ऐक्याचे प्रवर्तक : मोहम्मद पैगंबर
- रमजान ईद विशेष : मानवतेची हाक!
The post मौलाना मुफ्ती : मालेगावी नमाज अदा; फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज appeared first on पुढारी.