Lok Sabha Elections : नाशिकच्या आखा‌ड्यात शिंदे- उबाठा गटांत सामना?

शरद पवार, उद्धव ठाकरे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीवेळी नाशिकची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडण्याचे संकेत राष्ट्रवादीचे खा. शरद पवार यांनी दिल्याचा दावा उबाठा गटाचे उपनेते सुनील बागूल यांनी सोमवारी (दि. ११) केला. त्यांच्या दाव्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध उबाठा गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यात ४८ मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार हे निश्चित आहे. उत्तर महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या असलेल्या नाशिकवर सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सोमवारी (दि. ११) नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे खा. शरद पवार यांची उबाठा गटाच्या नेत्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर बागूल यांनी नाशिकची जागा उबाठा गटाला देण्याची तयारी खा. पवारांनी दाखविल्याचे सूतोवाच केले. त्यामुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन गटांत विभागली गेली आहे. सत्तेत सध्या भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. राज्यात विविध मतदारसंघांवर भाजप नेतृत्वाकडून दावे केले जात आहेत. त्यामध्ये नाशिकची जागा लढविण्याचे संकेतही भाजपने दिली आहेत, तर पवार गटही जागेकरिता आग्रही आहे. मात्र, नाशिकचा विद्यमान खासदार शिंदे गटाचा असल्याने तूर्तास जागेवर त्यांच्याच पक्षाचे पारडे जड आहे. दुसरीकडे नाशिकच्या जागेवरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत नसल्याचे वारंवार समोर येते. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी उमेदवाराचे नाव घोषित केले. त्यानंतर मविआत कुरबुरी वाढीस लागल्या. अशा वेळी नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. पवार यांनी उबाठा गटाच्या नेत्यांना येथील जागा सोडण्याचे संकेत दिले. तसे झाल्यास नाशिकमध्ये लोकसभेसाठी शिवसेनेचे दोन गट आमनेसामने उभे ठाकतील. अर्थात यामध्ये विजय कोणाचा होणार, हे मायबाप जनताच ठरवेल.

खा. पवारांनी दावा खोडला

चांदवड येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी नाशिकच्या जागेवरून उबाठा गटाच्या नेत्यांनी केलेला दावा खा. पवार यांनी खोडला. मविआतील जागा वाटप व्हायचे आहे. आघाडीची बैठक १९ डिसेंबरला होणार आहे. त्यानंतरच जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. खा. पवारांच्या या वक्तव्यामुळे उबाठा गट पुन्हा एकदा बॅकफूटवर गेला आहे.

आमच्या पक्षाची आठ जणांच्या कोअर कमिटीने खा. शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी गप्पांवेळी खा. पवारांनी मार्च- एप्रिलमध्ये लाेकसभा होणार आहे. येथे खासदार तुमचा असल्याने पक्षाने काय तयारी केली आहे, उमेदवार कोण असणार, याची सविस्तर माहिती जाणून घेतली. निवडणुकीमध्ये उबाठा गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराला येण्याचे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले. चांदवडमध्ये ते काय बोलले, हे आपल्याला माहिती नाही.

-सुनील बागूल, उपनेते, शिवसेना (उबाठा गट)

महायुतीमध्ये कोणतेही गट-तट नाहीत. नाशिकच्या जागेसाठी आम्ही दावाही केलेला नाही. नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील, तो उमेदवार निवडून आणणे, हे आमचे कर्तव्य आहे.

-अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

——-०——–

हेही वाचा :

The post Lok Sabha Elections : नाशिकच्या आखा‌ड्यात शिंदे- उबाठा गटांत सामना? appeared first on पुढारी.